नाशिक: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याचा तुटवडा जाणवत आहे आणि परिणामी कांद्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. कांद्याच्या किमतीत वाढ झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच आता एक अजब घटना समोर आली आहे. नाशिकमधील एका शेतकऱ्याचा तब्बल एक लाख रुपये किमतीचा कांदाच चोरीला गेला आहे. आश्चर्य वाटतयं ना? पण असं खरोखर झालं आहे.
नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात राहणाऱ्या राहुल बाजीराव पागर यांच्या शेतातून कांदा चोरीला गेला आहे. चोरी गेलेला कांदा २५ टन इतका होता आणि त्याची बाजारभावानुसार किंमत १ लाखांहून अधिक होती. राहुल यांनी हा कांदा आपल्या शेतात ११७ प्लॅस्टिक रॅकमध्ये ठेवला होता आणि चोरट्यांनी याच कांद्यावर डल्ला मारला आहे. या प्रकरणी राहुल यांनी कळवण पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
राहुल पागर यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी आपल्या शेतात ११७ प्लॅस्टिक रॅकमध्ये २५ टन कांदा ठेवला होता. रविवारी संध्याकाळी हा कांदा आपल्या शेतातून चोरीला गेल्याचं राहुल यांच्या लक्षात आलं त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले की, राहुल यांच्या तक्रारीनुसार आम्ही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तपास आणि शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे. स्थानिक बाजारपेठेसोबतच शेजारील गुजरात राज्यातही तपास सुरु करण्यात आला आहे.
तर तिकडे बिहार राज्यातही कांदा चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. बिहारमधील पाटणा जवळ असलेल्या फतुआ येथून कांदा चोरी झाल्याची घटना घडलीय. चोरी झालेल्या कांद्याची किंमत ८ लाख रुपयांच्या घरात आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.