शिर्डी : कोविड-१९च्या (Covid-19) पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशांचे आणि नियमांचे पालन करुन १६ नोव्हेंबर २०२० पासून शिर्डी साईबाबा मंदिरात (Shirdi Sai Baba Temple) दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार भाविक ऑनलाईन पास (Online pass for darshan) घेऊन दर्शन घेत आहेत. सुरुवातीच्या काळात दिवसभरात एकूण ६००० साईभक्तांना समाधी मंदिरात प्रवेश देण्यात येत होता. सद्यस्थितीत गुरुवार, शनिवार, रविवार, शासकीय सुट्ट्या आणि इतर महत्वाचे धार्मिक दिवस इत्यादी दिवशी शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांच्या संख्येत वाढ होत आहे. साधारणपणे १५००० पेक्षाही अधिक साईभक्त दर्शनासाठी शिर्डीत येत आहेत.
सुट्ट्या आणि वीकेंड यामुळे वाढती गर्दी लक्षात घेत आता साई संस्थानने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सर्व बाबींचा विचार करता शासनाचे कोविड-१९ संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन गर्दीच्या काळात जास्तीत जास्त १२,००० साई भक्तांना दर्शनासाठ प्रवेश देणे शक्य होणार आहे.
साई भक्तांच्या गर्दीचा ओघ असाच कायम राहिल्यास सलग सुट्टीच्या काळात आलेल्या सर्व भाविकांना श्री साईबाबांचे दर्शन उपलब्ध करुन देणे शक्य होणार नाही. पर्यायाने कोणत्याही पूर्व नियोजनाशिवाय क्षमतेपेक्षा जास्त भक्तगण शिर्डीत आल्यावर मोफत दर्शनपास वितरण काऊंटर तसेच दर्शन रांगेत गर्दी वाढून अभुतपूर्व परिस्थिती उद्भवू शकते. साईभक्तांची संभाव्य गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने सर्वांना सुलभ दर्शन व्हावे म्हणून खालील उपाययोजना करणे आवश्यक असल्याचं साई संस्थानने म्हटलं आहे.