शिवसेनेला नाशकात जोरदार धक्का, 350 कार्यकर्त्यांसह 36 नगरसेवकांचा राजीनामा

नाशिक
पूजा विचारे
Updated Oct 15, 2019 | 17:01 IST

आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना शिवसेनेला नाशिकमध्ये जोरदार झटका बसला आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या 350 पदाधिकारी आणि 36 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे.

Nashik Shivsena
शिवसेनेच्या 350 कार्यकर्त्यांसह 36 नगरसेवकांचा राजीनामा  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना शिवसेनेला नाशिकमध्ये जोरदार झटका बसला आहे.
  • नाशिकमध्ये शिवसेनेच्या 350 पदाधिकारी आणि 36 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे.
  • नाशिक पश्चिममधील शिवसेनेची बंडखोरी रोखून नेत्यांची मनधरणी करण्यात भाजप नेत्यांसह पालकमंत्री गिरीश महाजन यांना अपयश आलं आहे.

नाशिकः  आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना शिवसेनेला नाशिकमध्ये जोरदार झटका बसला आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या 350 पदाधिकारी आणि 36 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. नाशिक पश्चिममधील शिवसेनेची बंडखोरी रोखून नेत्यांची मनधरणी करण्यात भाजप नेत्यांसह पालकमंत्री गिरीश महाजन यांना अपयश आलं आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघाची जागा भाजपला देण्यात आल्यानं शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी थेट बंडखोरीचं हत्यार उपसलं. 

शिवसेनेचे बंडखोर विलास शिंदेंच्या पाठीशी बळ उभे करण्यासाठी राजीनामा देण्यात आला आहे. नाशिक पश्चिमची जागा भाजपसाठी सोडल्यानं भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी ही बंडखोरी केली. हा मतदार संघ भाजपसाठी सोडल्यानं नगरसेवकांसह सर्व पदाधिकारी नाराज झाले होते. या नाराजीतूनच राजीनामा नाट्य नाशिकमध्ये रंगलं. या मतदारसंघात भाजपनं घुसखोरी केली असं सांगत शिंदेच्या समर्थनार्थ शिवसेनेचे महानगर प्रमुख, पालिकेतील विरोधी पक्षनेते आणि 35 नगरसेवकांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पदाचे राजीनामे दिलेत. 

नाशिक पश्चिममध्ये भाजपच्या सीमा हिरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर या मतदारसंघातून विलास शिंदे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. तसं पाहायला गेल्यास नाशिक पश्चिम मतदारसंघात शिवसेनेची ताकद असल्यानं युतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेला सोडण्याची जोरदार मागणी करण्यात आली होती. त्यातच शिवसेनेचे जवळपास 22 नगरसेवक या मतदारसंघात आहेत. यामुळेत या मतदारसंघावर शिवसेनेनं दावा केला होता. पण त्याजागी सीमा हिरे या विद्यमान आमदार असल्यानं भाजपनं देखील आपला दावा सोडला नाही.  त्यातच जागावाटपामध्ये हा मतदारसंघ भाजपकडे गेला. त्यानंतर शिवसेनेचे इच्छुक, कार्यकर्ते आणि नगरसेवकांचा चांगलाच हिरमोड झाला. या नाराजीतून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांना निवडणूक तोंडावर आली असताना शिवसेनेला रामराम केला. त्यामुळे कल्याणनंतर नाशिकमधली युती फिसकटल्याचं चित्र आहे.  

दसऱ्या मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी इच्छुकांना तिकीट मिळल्यानं माफी देखील मागितली.  मी तमाम महाराष्ट्रातल्या सैनिकांना जिथे जिथे त्यांच्या जागा सुटल्या असतील त्यांची मी माफी मागतो, पण एक लक्षात घ्या तुमची ताकद कधीही कुठेही कमी होता कामा नये, असं उद्धव यांनी मेळाव्यात म्हटलं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी