MLA Suhas Kande: नाशिक: शिवसेनेचे (Shiv Sena) बंडखोर आमदार यांनी आता उघडउघडपणे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करु लागले आहेत. त्यामुळे आधीच फूट पडलेल्या शिवसेनेतील वातावरण अधिकच गढूळ झालं आहे. त्यातच नाशिकच्या (Nashik) नांदगाव मतदारसंघातील बंडखोर आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खूपच गंभीर आरोप केले आहेत.
'एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिलेली असताना देखील त्यांना झेड प्लस सुरक्षा (Z Plus Security) पुरविण्यात आली नाही. एवढंच नव्हे तर 'वर्षा'वरुन शंभूराज देसाई यांना फोन करुन सांगण्यात आलं होतं की, एकनाथ शिंदेंना सुरक्षा पुरवायची नाही.' असा गंभीर आरोप सुहास कांदे यांनी केला आहे.
अधिक वाचा: जयंत पाटलांच्या होर्डिंगवरून पवारांचा फोटो का झाला गायब?
पाहा सुहास कांदे यांनी नेमका काय आरोप केला:
'आज आदित्यजी नाशिकमध्ये आहे तर आम्ही आदित्य ठाकरेंची जरुर भेट घेऊ, ती पण आदरानेच घेऊ. परंतु आम्ही रस्त्यावरचे शिवसैनिक आहोत. आंदोलनातून शिवसेना मोठी केलेले शिवसैनिक आहोत. माझ्या स्वत:वर ५० पोलीस केसेस झालेल्या आहेत आणि मी तीन वेळा तडीपार झालो आहे. फक्त शिवसेना या पक्षासाठी.'
'पण मला सर्वात आधी आदित्य ठाकरेंना हा सवाल करायचा आहे की, ज्यांनी वयाच्या अठराव्या वर्षापासून आनंद दिघें यांच्या माध्यमातून राजकारण, समाजकारण सुरु केलं त्यांना नक्षलवाद्यांनी मारण्याची धमकी दिली. किंबहुना त्यांना मारण्यासाठी नक्षली ठाणे आणि मुंबईत आले. त्यावेळी इंटेलिजन्स ब्युरो, एसआयडी, सीआयडी असेल त्यांनी गृहमंत्र्यांना याबाबत रिपोर्टही केला. त्यानंतर सुद्धा त्यांची सुरक्षा वाढवली नाही. त्यांना खरं म्हणजे झेड प्लस सिक्युरिटीची गरज होती.'
अधिक वाचा: 'त्या' घटनेनंतर फडणवीसांचा सूर बदलला!
'हिंदुत्व विरोधकांना सुरक्षा पुरवली पण हिंदुत्ववाद्यांना सुरक्षा पुरवली नाही. ती का दिली नाही हे जनतेसमोर आलं पाहिजे. त्यावेळी सकाळी साडे आठ वाजता शंभूराज देसाई यांना 'वर्षा' बंगल्यावरुन फोन आला होता की, एकनाथ शिंदेंना सुरक्षा द्यायची नाही. का नाही दिली आमच्या शिंदे साहेबांना सुरक्षा?' असा सवाल विचारत सुहास कांदे यांनी एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्यावरच थेट आरोप केले आहेत.
'आम्ही काय नवाब मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसायचं का?'
'ज्यांनी बॉम्बस्फोट केले, ज्यामुळे हजारो कुटुंब उध्वस्त झाले त्या दाऊदचे आणि नवाब मलिकचे संबंध उघडकीस आले आहेत त्या मलिकांचा जेलमध्ये असतानाही राजीनामा घेतला नाही. तो हिंदुत्वविरोधी होता. त्याने अनेक हिंदू मारले. त्याच्याबरोबर आम्ही मांडीला मांडी लावून बसायचं का?' असा सवालही यावेळी सुहास कांदेंनी केला.
अधिक वाचा: शिंदेचा दानवेंवर पलटवार, 'तो काय त्यांचा बॉस आहे...'
'पालघरमध्ये साधूंची हत्या झाली. मारेकऱ्यांचा दोन दिवसात जामीन झाला. अशा हिंदुत्वविरोधी लोकांच्या मांडीला मांडी लावून बसायचं का आम्ही?' असंही सुहास कांदे म्हणाले.
'मातोश्री'चे दरवाजे सगळ्यांसाठी खुले आहेत: आदित्य ठाकरे
दरम्यान, शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे आज (22 जुलै) नाशिक दौऱ्यावर आहेत. याचवेळी त्यांना सुहास कांदे हे भेट घेणार असल्याचं विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की, 'नक्कीच भेटू. भेटीची वेळ मागितली तर नक्की भेटू. त्यांनी मातोश्रीवर पण यावं. मातोश्रीचे दरवाजे आम्ही कधीच कोणासाठी बंद केले नव्हते.'
मात्र, दुसरीकडे नाशिकमधील शिवसैनिक हे प्रचंड संतप्त झाल्याचं पाहायला मिळत आहेत. सुहास कांदे यांनी गद्दारी केली असल्याची घोषणाबाजी त्यांच्याकडून सातत्याने सुरु आहे. त्यामुळे आज नाशिकमध्ये आदित्य ठाकरे आणि सुहास कांदे यांची भेट होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.