धुळे : राज्यातील (Maharashtra State) अनेक भागातील कमाल तापमानात (Temperature) मोठी घट झालेली बघायला मिळत आहे. पुढील दोन दिवस राज्यात थंडीचा कडाका अजून कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानात घसरण झाली आहे. जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढल्याने त्याचा परिणाम जनजीवनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वातावरणात मोठ्या प्रमाणात गारठा वाढल्याने सकाळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या घटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यंदाच्या हंगामातील सर्वांत नीचांकी तापमानाची नोंद धुळे जिल्ह्यात करण्यात आली मागील महिन्यात 5 अंश सेल्सिअस इतके तापमान होतं तर काल 4.5 अंश सेल्सिअस तर आज 2.8 इतक्या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
या वातावरणाचा परिणाम रब्बी पिकांवर देखील होणार असून गहू, हरभरा, मका या पिकांवर करपा रोगासारख्या अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात तज्ञा कडून वर्तवण्यात येत आहे. वाढत्या थंडीचा परिणाम लक्षात घेता हृदयाचे आजार असणाऱ्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील वैद्यकीय तज्ञांच्या वतीने करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात थंडीची लाट कायम असून या भागातील तापमान 5 अंश सेल्सियसवर गेलं आहे. तर, तोरणमाळ परिसरात दव बिंदू गोठल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार सुरू आहे. गोंदियात किमान तापमान 10 अंश सेल्सिअसवर आलं आहे. यामुळे पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला आहे. अशातच गोंदियात थंडीची लाट येणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीडमधील किमान तापमान 10 अंश सेल्सिअस खाली राहणार आहे. यंदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने अवघं वातावरण ढवळून काढले आहे.