Ajit Pawar : नाशिक : गृह विभागाच्या बळकटीकरणासाठी कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तसेच वर्ष 2021-22 च्या अर्थसंकल्पात पोलिसांच्या घरांसाठी 737 कोटी रुपयांची तर यावर्षीच्या अर्थसंकल्पात 802 कोटींच्या तरतूदीसह पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी एकूण 1 हजार 29 कोटींची तरतूद करण्यात आली आहे अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. (thousand crore fund for maharashtra home department says ajit pawar)
महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या 119 व्या सत्राच्या दीक्षांत समारंभात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथक) संजय कुमार, महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालक राजेश कुमार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पोलीस दलात 7 हजार 231 पदांची भरती करण्यात येणार असून शिपाई पदावर भरती झालेला कर्मचारी 30 वर्षानंतर निवृत्त होतांना खात्रीने सब इन्स्पेक्टर होईल अशा पद्धतीने कालबद्ध पदोन्नतीची रचना करण्यात आली असून राज्यातील जुन्या पोलीस स्टेशनच्या इमारतींचे दुरूस्ती व नुतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातील 87 पोलीस स्टेशनच्या बांधकामांना सुरूवातही झाली आहे. महिला पोलिसांच्या दैनंदिन कर्तव्याची वेळ आठ तासांची करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. येणाऱ्या काळात राज्यात पोलीसांसाठी 1 लाख घरे निर्माण केली जाणार आहेत, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्राच्या पोलिस दलाला गौरवशाली इतिहास आहे. पंजाबमधला दहशतवाद मोडून काढणाऱ्या पोलिस महासंचालक जे. एफ. रिबेरो साहेबांपासून, शहीद तुकाराम ओंबळे यांच्यासारख्या शूर, कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलिस दलाचा लौकिक वाढवला आहे. महाराष्ट्र पोलिसांचा जगात असलेला लौकिक तुम्ही सर्वजण टिकवून महाराष्ट्र पोलिसांचा गौरव वाढवाल, पोलिस दलाचं सामर्थ्य सिद्ध करुन दाखवाल, याबाबत शंका नाही. आपली बांधिलकी ही भारतीय राज्यघटना, नियम व कायद्यांशी असली पाहिजे. जात-पात, धर्म-पंथ, वैचारिक बांधिलकी, राजकीय, सामाजिक, धार्मिक विचारसरणी या गोष्टींना वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात स्थान असणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. तसेच वैयक्तिक आस्थांचं पालन घराच्या उंबरठ्याच्या आत करावं, वैयक्तिक आस्थांचं प्रदर्शन टाळल्यास यातूनच देश पुढे जाण्यास मदत होणार आहे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलिस दलात रूजू होणाऱ्या अधिकाऱ्यांना केले आहे.
गेल्या वर्षी 9 ऑगस्टला 30 कोटी 60 लाख रुपये खर्च करुन पोलीस अकादमीत बांधलेल्या सिंथेटिक ट्रॅक, टर्फ फुटबॉल मैदान, ॲस्ट्रोटर्फ हॉकी मैदान, नुतन नैसर्गिक जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन केलं होतं. यापुढच्या काळातही, महाराष्ट्र पोलिसांच्या प्रशिक्षणाचा दर्जा वाढवून दल अधिक सक्षम, समर्थ करण्यासाठी, पोलिस अकादमीत अत्याधुनिक प्रशिक्षण इमारतीसाठी 7 ते 10 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासोबतच आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिली आहे.
सत्र 119 च्या तुकडीतल्या 12 महिला अधिकाऱ्यांसह सर्व 309 अधिकारी या सन्मानासाठी तितकेच सक्षम, पात्र आहे. या तुकडीतला प्रत्येक अधिकारी भविष्यकाळात महाराष्ट्र पोलिसांच्या माध्यमातून राज्याची चांगली सेवा करेल, असा विश्वास आहे. तसेच राज्यातले अनेक तरुण दरवर्षी एमपीएससीची तयारी करत मेहनत घेऊन परीक्षा देतात. पोलिसाची वर्दी अंगावर घालण्याचं या तरुणांच स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीव ओतून मेहनत घेतात. त्यापैकी काहींनाच यश मिळून दीक्षांत समारंभापर्यंत पोहचण्याच भाग्य फारच थोड्या जणांच्या वाट्याला येतं. आज तुम्हा 322 जणांच्या वाट्याला ते भाग्य आलं आहे. याचा तुमच्या
कुटुंबियांप्रमाणेच आम्हालाही मनापासून आनंद आहे. आपण सर्व पोलिस दलातील सेवा, कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडून उत्तम पोलिस अधिकारी, एक चांगला माणूस म्हणून लोकांच्या मनात स्थान निर्माण कराल. तसेच या भावी अधिकाऱ्यांच्या यशात, अकादमीच्या प्रशिक्षकांच्या योगदानाचाही मोठा वाटा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.