नाशिक : पाथर्डी गावाजवळ पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यावर एका व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. त्याचवेळी या घटनेमुळे पेट्रोल पंपावर आणि परिसरात एकच खळबळ उडाली होती. महिलेला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महिलेवर धारदार शस्त्राने वार केल्याची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. (Woman employee of petrol pump attacked with sickle, incident captured in CCTV)
अधिक वाचा : Chandrapur Accident : मृत्यूचा Selfie! एका क्लिकच्या नादात तलावात बुडून दोघांचा मृत्यू
इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय वांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाथर्डी गाव-वडनेर रस्त्यावरील जाधव पेट्रोलियम पंपावर काम करणारी महिला आपली ड्युटी करत होती. त्याचवेळी एक व्यक्ती कोयता घेऊन तेथे आला आणि त्याने महिलेवर हल्ला केला. जीव वाचवून महिला पळू लागली, मात्र हल्लेखोर तिच्या मागे धावू लागला. यावेळी पेट्रोल पंपावर उपस्थित लोकांमध्ये खळबळ उडाली.
हल्लेखोराने महिलेला अनेक ठिकाणी कोयत्याने वार करीत होता. यादरम्यान काही लोकांनी महिलेला वाचवण्याचा प्रयत्नही केला, मात्र हल्लेखोराच्या हातात धारदार शस्त्र पाहून कोणीही तिच्या जवळ जाण्याचे धाडस करू शकले नाही. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. झुबेदा शेख असे पीडित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित प्रमोद गोसावी असे हल्ला करणाऱ्या इस्माचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.