Onion Crope : धुळे : शेतकरी आणि कांदा हे जणू समीकरण जुळले आहे. अनेक वर्षापासून शेतकऱ्य़ांना कांदा या पिकाने आधार दिला असून कांद्यावरच शेतकऱ्य़ांचे आर्थिक चक्र फिरत आलेले आहे. बऱ्याच वेळा कांद्याला कधी जास्त तर कधी कमी भाव मिळत असतो. पण शेतकरी मात्र कांद्याला अंतर देत नाही. आजही शेतकऱ्य़ांचे नगदी पीक म्हणून कांदा पिकाकडे पाहिले जाते. असे असले तरी दिवसेंदिवस कांदा पीक मात्र खर्चिक बनत चालले आहे. दर आठ पंधरा दिवसात येणाऱ्य़ा ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात पीक फवारणीचा खर्च वाढत चाललेला आहे. त्यात यावर्षी मात्र मोठ्या प्रमाणात शेतकऱ्य़ांना मजुरांची कांदा लागवडीसाठी टंचाई भासत आहे. चार पैसे अधिक देऊन मजूर शोधावे लागत असून सध्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्य़ांच्या कांदा लागवड सुरू आहे. त्यामुळे कितीही संकटे आली तरी शेतकरी कांदा पिकावर ठाम आहे आणि यावर्षीही मोठ्या प्रमाणात कांदा लागवड होणार आहे. (farmer getting onion crop in dhule after facing lots of problems )
यावर्षी अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्य़ांचे कांदा बियाणे वाया गेल्याने शेतकऱ्य़ांनी पुन्हा कांदा बियाणे टाकले. कांद्याचे बियाणे उशिरा पडल्याने उन्हाळा कांदा लागवडीला उशीर होणार आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवडी होणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सध्या शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड चालू असल्याने शेतकरी मिळेल त्या ठिकाणाहून मजूर आणून कांदा लागवड करत आहे. कारण सुरुवातीला झालेल्या पावसामुळे दररोज पडणारे दव, धुके आणि व ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याची रोपे खराब होत होती. मजुरांची टंचाई भासू लागल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्य़ांनी मध्य प्रदेशातील सेंधवा परिसरातील मजुरांना आणून कांद्याची लागवड केली. त्यामुळे या परराज्यातील शेकडो मजुरांमुळे कांदा लागवडीला आधार मिळाला आहे. या वर्षी मजुरांची टंचाई भासू लागल्याने अनेक शेतकऱी ठिबक सिंचनावर कांदा लागवड करत आहेत. त्यामुळे पाणी भरण्यासाठी लागणारी मजुरीही वाचणार आहे.
गेल्या एक-दीड महिन्यापासून वातावरण चांगले असल्याने शेतकऱ्य़ांनी खते,औषधे फवारणी केल्याने कांद्याचे पीक बहरले आहे. वातावरणाने साथ दिल्यास चांगले उत्पादन निघण्याची शेतकऱ्य़ांना आशा आहे. शिरपूर तालुक्याच्या पश्चिम भागात उन्हाळी कांद्याचे क्षेत्र कमी असते, तर पोळ, लाल कांद्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असते. मार्च महिन्यापर्यंत पाणी पुरेल याची शाश्वती नसल्याने या भागात उन्हाळी कांद्याचे कमी प्रमाणात उत्पादन घेतले जाते.
हवामान तज्ञांनी दहा ते पंधरा डिसेंबर दरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे रोगट हवामानाचा कांदा पिकावर परिणाम होऊन करपा व सडण्याची भीती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.