पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला HALमधून अटक

HAL employee arrested for spying for Pakistan हिंदुस्तान एअरोनॉटिक्सच्या ओझर युनिटमधून हेरगिरी प्रकरणी एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली. तो ISIला गोपनीय माहिती देत होता.

HAL employee arrested for spying for Pakistan
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला HALमधून अटक 

थोडं पण कामाचं

  • पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला HALमधून अटक
  • हिंदुस्तान एअरोनॉटिक्सच्या ओझर युनिटमध्ये सुरू होती हेरगिरी
  • आरोपीला १० दिवसांसाठी पोलीस कोठडी, महाराष्ट्र एटीएस करत आहे तपास

नाशिक: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स (Hindustan Aeronautics Limited - HAL) कंपनीच्या ऑफिसमधून हेरगिरी प्रकरणी एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली. हा कर्मचारी सतत पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयला देशाच्या संरक्षणाशी संबंधित गोपनीय माहिती पुरवत होता. या प्रकरणी महाराष्ट्र एटीएसच्या (Maharashtra Anti-Terrorism Squad - Maharashtra ATS) नाशिक युनिटने कारवाई केली. आरोपी विरोधात ऑफिशिअल सीक्रेट अॅक्ट (official secrets act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले आणि १० दिवसांसाठी पोलीस कोठडीत पाठवण्यात आले. एटीएस या कालावधीत आरोपीची आणखी चौकशी करणार आहे. (HAL employee arrested for spying for Pakistan; was supplying information to ISI about Indian fighter jets)

नाशिक जवळच्या ओझरमध्ये (Ozar, Nashik) हिंदुस्तान एअरोनॉटिक्स कंपनीचा कारखाना आहे. या ठिकाणी स्वदेशी लढाऊ विमानाच्या निर्मितीचे काम सुरू आहे. याच ठिकाणी हेरगिरी करुन गोपनीय माहिती पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयला पुरवण्याचे काम सुरू होते. एटीएसच्या टीमने अटक केलेल्या व्यक्तीने आयएसआयला ओझर युनिटमध्ये सध्या सुरू असलेले काम, विमानाचे तपशील अशी गोपनीय माहिती पुरवायला सुरुवात केली होती. या प्रकरणात एटीएस चौकशी करुन नेमकी कोणकोणती माहिती पाकिस्तानला पुरवण्यात आली ते जाणून घेऊन संरक्षण मंत्रालयाला अहवाल देणार आहे. 

अटकेतील आरोपीकडून एटीएसने पाच सिमकार्ड, ३ मोबाइल हँडसेट, २ मेमरी कार्ड जप्त केली आहेत. हे साहित्य एटीएसने फॉरेंसिककडे तपासणीसाठी पाठवले आहे. या तपासणीतून आरोपीने केलेल्या हेरगिरीविषयी आणखी माहिती मिळण्याची शक्यता आहे. 

हिंदुस्तान एअरोनॉटिक्समधील हेरगिरी प्रकरणी एटीएसचे अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती, महासंचालक जयंत नाईनवरे, रविंद्रसिंग परदेशी, पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड, एसीपी सुनिल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. पाकिस्तानला मिळालेली माहिती जाणून घेऊन हेरगिरीमुळे झालेले नुकसान भरुन काढण्याबाबत लवकरच उच्च पातळीवर निर्णय होणार असल्याचे वृत आहे.

नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे दहशतवादी बिलाल शेख हेरगिरी करत होता. त्याला अटक झाल्यानंतर देवळाली कँप परिसरातील आर्टिलरी सेंटर येथे तोफांच्या प्रशिक्षण केंद्रात हेरगिरी करताना २१ वर्षांच्या संजीवकुमार अशी ओळख सांगणाऱ्या तरुणाला अटक झाली. त्याने प्रशिक्षण केंद्रातली महत्त्वाची माहिती आणि फोटो पाकिस्तानमधील व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवल्याचे उघड झाले होते. 

एका आठवड्याच्या आत नाशिक जिल्ह्यात पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी दोघांना अटक झाली आहे. आधी देवळालीच्या आर्टिलरी सेंटरमध्ये हेरगिरी झाल्याचे प्रकरण उघडकीस आले. पाठोपाठ ओझरच्या हिंदुस्तान एअरोनॉटिक्सच्या कारखान्यातली हेरगिरी उघड झाली. 

सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय अन्वेषण एजन्सीने (एनआयए) पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि केरळमधील एर्नाकुलम येथे छापे टाकून अल कायदाच्या मॉड्युलचा भांडाफोड केला. अल-कायदाच्या तब्बल ९ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. मोठ्या प्रमाणात चिथावणीखोर साहित्य, डिजिटल उपकरणे, कागदपत्रे, जिहादी साहित्य, धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली. पकडलेले नऊजण दहशतवादी कारवायांसाठी पैसा गोळा करण्यातही गुंतले होते.

एनआयएच्या कारवाई व्यतिरिक्त सप्टेंबरमध्ये दिल्ली पोलिसांनीही एक कारवाई केली. दिल्ली पोलिसांनी मुक्त पत्रकाराच्या रुपात चीनसाठी २०१६ पासून हेरगिरी करत असल्याप्रकरणी राजीव शर्मा (rajeev sharma) याला अटक केली. दिल्लीच्या पीतमपुरा भागातून त्याला अटक करण्यात आली. राजीव व्यतिरिक्त त्याचे सहकारी असलेल्या एका चिनी महिलेला तसेच एका नेपाळी नागरिकालाही अटक करण्यात आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी