डेक्कन क्विनच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज, प्रवासाचा 'एवढा' वेळ होणार कमी

पुणे
Updated Mar 13, 2019 | 14:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mumbai pune deccan queen: डेक्कन क्वीननं नेहमी प्रवास करणाऱ्या मुंबई पुणे प्रवाशांसाठी गुड न्यूज आहे. रेल्वेच्या एका निर्णयामुळे या प्रवाशांचा दिवसभरातील अमूल्य वेळ वाचणार आहे.

Deccan queen express
डेक्कन क्विनच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज, प्रवासाचा 'एवढा' वेळ होणार कमी 

मुंबई: दररोज मुंबई पुणे रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि त्यातही जर का ते प्रवासी डेक्कन क्वीननं प्रवास करत असतील तर त्यांना तर डबल गुड न्यूज आहे असंच म्हणावं लागेल.  कारण डेक्कन क्वीनचा प्रवास तब्बल अर्ध्या तासानं कमी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे नेहमी डेक्कन क्वीननं मुंबई- पुणे असा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचा वेळ वाचणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. मुंबई पुण्याच्या प्रवाशांची आवडती आणि सर्वांत लाडकी एक्स्प्रेस डेक्कन क्विनमध्ये नवीन लिंक होमन- बुश रेक वापरणार आहे. 

नवीन लिंक होमन-बुश रेकमध्ये असलेल्या पुश अँड पुल तंत्रज्ञान आहे. याच तंत्रज्ञानामुळे दोन्ही शहरांमधील अंतर हे ३० ते ३५ मिनिटांनी कमी होण्यास मदत होईल. येत्या काही महिन्यांतच डेक्कन क्वीन या एक्स्प्रेसमध्ये हे नवीन रेक जोडले जाणार आहेत. त्यामुळे डेक्कन क्वीनच्या प्रवाशांना लवकरच चांगली सुविधा मिळणार आहे. तसेच दिवसभरातला प्रवासातील त्यांचा एक तास वेळ वाचणार आहे. 

डेक्कन क्वीन ही पुण्याहून सकाळी ७.१५ वाजता निघते आणि मुंबई सीएसएमटीला १०. २५ मिनिटांनी पोहचते. त्याच दिवशी संध्याकाळी ५.१० सीएसएमटीहून निघते आणि रात्री ८.२५ ला पुण्याला पोहोचते. सध्या डेक्कन क्वीन एक्स्प्रेसचा प्रवास हा साधारण तीन ते सव्वातीन तासात पूर्ण होतो. पण आता लिंक होमन बुश रेक बसवल्यास जवळपास प्रवाशांचा दिवसातला एक तास वाचणार आहे. 

डेक्कन क्विननं प्रवास करणाऱ्यांची संख्या अफाट आहे. त्यातही पासधारक वेगळेचं. महिला, जनरल डब्बा असलेल्या डेक्कन क्विनचे प्रवासी ही पुण्यात राहून मुंबईत दररोज काम करणारे कर्मचारी आहेत. मंत्रालयात, तसेच काही वकिल, सरकारी कर्मचारी आणि व्यावसायिक आहेत. त्यामुळे रेल्वेच्या या निर्णयामुळे या सर्वांचा दिवसभरातील एक तास हा अमूल्य वेळ नक्कीच वाचेल. 

डेक्कन क्वीन ही दुसरी एक्स्प्रेस आहे ज्यात लिंक होमन-बुश रेक वापरण्यात येणार आहे. पहिल्यांदा मध्य रेल्वेनं सीएसएमटी- निझामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसमध्ये हे तंत्रज्ञान वापरण्यात आलं होतं. पुश अँड पुल या टेक्नॉलॉजीमध्ये ट्रेनच्या पुढे आणि मागे असं दोन लोकोमोटिव्ह बसवले जातात. त्यामुळे ट्रेनला स्थिरता येते. 

डेक्कन क्वीन ही ८८ वर्ष जुनी ट्रेन आहे. मुंबई पुणे असा दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी तर ही ट्रेन म्हणजे दुसरं घरं आहे. या ट्रेनमध्ये सगळे सण उत्सव ही साजरे केले जातात.  १ जून १९३० साली सुरू झालेली डेक्कन क्वीनचा प्रवास ८८ वर्षं अजूनही तसाच आहे. ही ट्रेन पहिली सुपरफास्ट डिलक्स ट्रेन आहे. सुरूवातीला ७ डब्यांची असणारी ही ट्रेन आता १७ डबे घेऊन धावते. या ट्रेनचं वैशिष्ट्य म्हणजे ही अशी एकमेव ट्रेन आहे ज्यात डायनिंग कारची सुविधा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी