पुण्यातील 'या' इंजिनिअरला बनायचंय काँग्रेस अध्यक्ष, करणार अर्ज दाखल

पुणे
Updated Jul 22, 2019 | 11:14 IST

Congress President: काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष पदावर पुण्यातील एका इंजिनिअरची नजर आहे. त्यासाठी तो योजना बनवतोय.

Congress Flag
पुण्यातील 'या' इंजिनिअरला बनायचंय काँग्रेस अध्यक्ष   |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधींचा राजीनामा
  • पुण्यातील २८ वर्षीय इंजिनिअरची काँग्रेस अध्यक्ष बनण्याची इच्छा
  • काँग्रेस पक्षाचा पुढील अध्यक्ष कोण होणार?

पुणे: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राहुल गांधींनी राजीनामा दिल्यावर आता नव्या अध्यक्षाचा शोध सुरू आहे. पक्षातील या सर्वोच्च पदासाठी अनेक दावेदारांची नावं समोर आली आहेत. आतापर्यंत ज्यांची नावे समोर आली आहेत ते काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते, कार्यकर्ता आहेत. मात्र, आता या यादीत असं एक नाव जोडलं गेलं आहे जो काँग्रेस पक्षाचा नेता ही नाहीये आणि कार्यकर्ता सुद्धा नाहीये. होय, पुण्यातील एका इंजिनिअर तरुणाला राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस अध्यक्षपद सांभाळण्याची इच्छा आहे.

२८ वर्षीय इंजिनिअरची तयारी सुरू

पीटीआय वृत्त संस्थेच्या मते, पुण्यातील २८ वर्षीय एका इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरने काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे हा इंजिनिअर तरुण काँग्रेस पक्षाचा नेता नाहीये आणि सदस्यही नाहीये. या इंजिनिअरचं नाव गजानंद होसले असं आहे. गजानंद हा पुण्यातील एका फर्ममध्ये मॅनेजर पदावर कार्यरत आहे. काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष बनण्यासाठी गजानंद याने येत्या २३ जुलै रोजी पुणे काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्याकडे सदस्य होण्यासाठी अर्ज करण्याची तयारी केली आहे.

मंगळवारी करणार अर्ज

गजानंद होसले याने सांगितले की, "राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे आणि ते आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे आता अध्यक्षपदाची कमान कुणाकडे सोपवावी यावर पक्षात अद्याप निर्णय झालेला नाहीये. त्यामुळे या पदासाठी मी अर्ज करु इच्छित आहे. मंगळवारी अध्यक्षपदासाठी अर्ज करण्यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वची प्रक्रिया पूर्ण करेल".

काँग्रेसच्या नव्या अध्यक्षपदासाठी आतापर्यंत ज्या दावेदारांची नावे मीडियात समोर आली आहेत त्यामध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, अशोक गहलोत, मोतीलाल वोहरा, मल्लिकार्जुन खर्गे यांसारख्या नावांचा समावेश आहे. 

राहुल गांधींचा राजीनामा

लोकसभा निवडणूक २०१९ च्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीत भाजपने मोठं यश मिळवत केंद्रात एकहाती सत्ता मिळवली. काँग्रेस पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यावर राहुल गांधी यांनी एक ओपन लेटर प्रसिद्ध करत म्हटलं, 'काँग्रेस पक्षासाठी काम करणं हे माझ्यासाठी एक सन्मानाची गोष्ट आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवासाठी अध्यक्ष म्हणून मी जबाबदारी स्वीकारतो आणि आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतो'.

महाराष्ट्रातही फेरबदल

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रातही मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये अनेक फेरबदल करण्यात आले आहेत. अशोक चव्हाण यांच्या जागेवर प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली. तसेच थोरात यांच्यासोबतच पाच कार्याध्यक्षांचीही नियुक्ती करण्यात आली. या पाच कार्याध्यक्षांमध्ये नितीन राऊत, विश्वजीत कदम, बसवराज पाटील, यशोमती ठाकूर, मुझफ्फर हुसैन यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
पुण्यातील 'या' इंजिनिअरला बनायचंय काँग्रेस अध्यक्ष, करणार अर्ज दाखल Description: Congress President: काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष पदावर पुण्यातील एका इंजिनिअरची नजर आहे. त्यासाठी तो योजना बनवतोय.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...