पुण्यात स्पा सेंटरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ५ परदेशी मुलींची सुटका

पुणे
सुनिल देसले
Updated Sep 21, 2019 | 23:12 IST

Sex Racket busted in Pune: पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. कोरेगाव पार्क येथे स्पा सेंटरच्या नावाखाली हे रॅकेट सुरु होतं. पोलिसांनी या स्पा सेंटरवर धाड टाकत कारवाई केलीय.

pune police busted sex racket spa center koregaon park thai women rescued maharashtra
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
  • पुणे पोलिसांनी स्पा सेंटरवर धाड टाकत केला पर्दाफाश
  • पाच परदेशी मुलींची पोलिसांनी केली सुटका
  • कोरेगाव पार्कमध्ये झिवांका स्पा अॅन्ड वेलनेस सेंटर नावाने सुरु होतं स्पा सेंटर
  • आरोपी विरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

पुणे: पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. हे सेक्स रॅकेट एका स्पा सेंटरमध्ये सुरु होतं. पोलिसांच्या टीमने बुधवारी संध्याकाळी स्पा सेंटरवर छापा टाकत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरुन पाच परदेशी मुलींची सुटका केली आहे.

पुणे पोलिसांच्या क्राइम ब्राँच युनिटमधील सामाजिक सुरक्षा विभागाला एक गुप्त माहिती मिळाली होती की, कोरेगाव पार्कमधील स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरु आहे. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या टीमने त्याची खातरजमा केली. स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची पोलिसांना खात्री पटली आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. 

पोलिसांचा स्पा सेंटरवर छापा

पुणे पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी ५.१० मिनिटांनी कोरेगाव पार्कमधील झिवांका स्पा अॅन्ड वेलनेस सेंटरवर अचानक छापा टाकला. पोलिसांनी छापा टाकून आरोपी गोपाळ रमेश मिश्रा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. तर त्याने वेश्या व्यवसायासाठी परदेशातून आणलेल्या पाच मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे. आरोपी गोपाळ रमेश मिश्रा हा या परदेशी मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होता. आरोपी ३२ वर्षीय गोपाळ मिश्रा हा पुण्यातील गंगानिवास रामनगर येथे राहतो. 

परदेशी मुलींची सुटका

पोलिसांनी आरोपी गोपाळ मिश्रा याच्या विरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अनधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. तर घटनास्थळावरुन सुटका करण्यात आलेल्या पाचही परदेशी मुलींना संरक्षण आणि पुनर्वसनकामी रेस्क्यु फाऊंडेशन मुंढवा, पुणे येथे पाठवण्यात आले आहे.

परदेशी मुली टूरिस्ट व्हिसावर भारतात

पुणे पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकून पाच परदेशी मुलींची सुटका केली आहे. या सर्व मुली पर्यटन व्हिसावर भारतात वास्तव्यास होत्या. या तरुणींकडून आरोपी वेश्या व्यवसाय करुन घेत होता.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी