मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. खुर्जेकर यांचा मृत्यू 

पुणे
Updated Sep 16, 2019 | 14:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर गहुंजे गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात पुण्यातील सुप्रसिद्ध अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. केतन खुर्जेकर यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

pune spine surgeon dr ketan khurjekar and his driver died in an accident on mumbai pune expressway near talegaon gahunje news in marathi
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. खुर्जेकर यांचा मृत्यू   |  फोटो सौजन्य: Twitter

पिंपरी चिंचवड :  यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर गहुंजे गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात पुण्यातील सुप्रसिद्ध अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. केतन खुर्जेकर यांचा दुर्देवी मृत्यू झाला. या अपघातात डॉक्टरांचा चालक ज्ञानेश्वर भोसले यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात डॉ. खुर्जेकर यांच्या गाडीला मागू येणाऱ्या लक्झरी बसने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा मागील भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात इतर दोन डॉक्टर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे डॉ. केतन खुर्जेकर यांचा आज वाढदिवस होता. डॉ. खुर्जेकर हे पुण्यातील संचेती हॉस्पीटलमध्ये आपली प्रॅक्टीस करत होते. 

जयेश पवार आणि प्रमोद भिलारे हे अशी इतर जखमी झालेल्या डॉक्टरांची नावे आहेत. या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा भीषण अपघात तळेगाव आणि गहुंजे गावाजवळ काल रात्री १०.३० च्या सुमारास घडला. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

डॉ. खुर्जेकर एका मेडिकल कॉन्फरन्समध्ये भाग घेण्यासाठी मुंबईला आले होते. मुंबईहून परतत असताना तळेगाव जवळ त्याची गाडी एमएच १४ जीयू ११५८ या गाडीचे टायर पंक्चर झाले. डॉ. खुर्जेकर आणि त्यांचा ड्रायव्हर ज्ञानेश्वर भोसले या कारचे पंक्चर काढत होते. त्याच वेळी भरधाव वेगात येणाऱ्या लक्झरीने रस्त्याच्या कडेला असलेल्या कारला मागून जोरदार धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. 

वैद्यकीय क्षेत्राची मोठी हानी...

याबाबत संचेती हॉस्पीटलचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. पराग संचेती यांनी दिलेल्या श्रद्धांजलीत म्हटले की, डॉ. खुर्जेकर यांच्या अकस्मीक जाण्याने वैद्यकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. खुर्जेकर हे निष्णात अस्थीरोग तज्ज्ञ होते. ते संचेती हॉस्पिटलमध्ये अस्थीरोग विभागाचे प्रमुख होते. डॉ. खुर्जेकरांनी आतापर्यंत मणक्यांच्या ३५०० शस्त्रक्रिया केल्या होत्या. त्यांना एमएस ऑर्थोपेडिक्समध्ये गोल्डमेडल मिळाले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी