पुण्यात रस्त्यावरुन जाणाऱ्या व्यक्तीचा गोळी लागून मृत्यू, दोन गटातील गोळीबारात सामान्य व्यक्तीचा बळी

पुणे
Updated Aug 14, 2019 | 11:34 IST

Pune Firing: पुण्यासारख्या शहरामध्ये गुन्हेगार पुन्हा डोकं वर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. काल पुण्यात दोन गटातील गोळीबारात एका सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

gun
पुण्यात रस्त्यावरुन जाणाऱ्या व्यक्तीचा गोळी लागून मृत्यू  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • दोन गटातील गोळीबारात सामान्य माणसाचा हकनाक बळी 
  • गोळीबारात ५५ वर्षीय सुरक्षा रक्षकाचा मृत्यू 
  • फरार आरोपींना शोधून काढण्याच पुणे पोलिसांसमोर आव्हान

पुणे: पुण्यातील हडपसरमध्ये काल (मंगळवार) दोन गटात झालेल्या गोळीबारात रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीचा हकनाक मृत्यू झाल्याची अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू झालेला इसम हा बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. ज्यावेळी दोन गटात गोळीबार झाला तेव्हा तो रस्त्याने जात होता. तेव्हाच एका गोळीने त्याचा वेध घेतला आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, गोळीबार करणाऱ्या दोन्ही गटातील लोकं हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. पण या सगळ्या प्रकारामुळे पुण्यातील गुन्हेगारी क्षेत्र पुन्हा डोकं वर काढत असल्याचं दिसून येत आहे. सध्या पोलीस गोळीबार केलेल्या आरोपींचा कसून शोध घेत आहेत. यासाठी पुण्यातील अनेक भागांमध्ये छापेमारीही सुरु करण्यात आली आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव पंचय्या स्वामी असं होतं. ते बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. ते ५५ वर्षांचे होते. रस्त्यावरुन जाताना अचानक गोळी लागल्याने त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखलही करण्यात आलं होतं पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकारामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

दुसरीकडे गोळीबार करणाऱ्या आरोपींची ओळख पटली असून एका आरोपीचं नाव मयूर गुंजाळ आणि दुसऱ्याचं तेजस कल्याणी असं असल्याचं समजतं आहे. हे दोघेही आरोपी पुण्यातील हडपसरमध्येच राहत होते. दोन्ही आरोपींमध्ये काही कारणांवरुन वाद होते. त्यामुळे आतापर्यंत अनेकदा दोघांमध्ये वादही झाले होते. हे दोघंही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. काल देखील दोघांमध्ये वाद झाला आणि याचवेळी दोघांनी गोळीबार सुरु केला. 

अचानक रस्त्यावर गोळीबार सुरु झाल्याने नागरिकही भयभीत झाले. त्याचवेळी पंचय्या स्वामी हे त्याच रस्त्यावरुन जात होते. पण अचानक एक गोळी त्यांना लागली. ज्यामुळे त्यांचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असून ते सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. 

पुण्यात मागील काही वर्षात गुन्हेगारीचं प्रमाण सतत वाढत आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. पुण्यात सध्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांचं प्रस्थ वाढत चाललं आहे. जर पुणे पोलिसांनी वेळीच या गुन्हेगारांना आवर घातला नाही तर मात्र, ही समस्या जटील होण्याची दाट शक्यता आहे. पुणे आणि परिसरात सध्या अनेक व्यवसाय आणि कंपन्या येत आहेत. पण यामुळेच येथील टोळी युद्धातही वाढ होत असल्याचं दिसून येतंय. शिक्षणाचं माहेरघर, आयटी हब आणि आता औद्यगिक विकास होणारं शहर अशी ओळख असलेल्या पुण्यात आता गुन्हेगारांचं प्रस्थ वाढत चाललं आहे. पुण्यात सध्या अनेक राज्यात बऱ्याच लोकांचा लोंढा येत आहे. यामुळे देखील गुन्हेगारीत वाढ होत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून कठोर कारवाईची अपेक्षा पुणेकर करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
पुण्यात रस्त्यावरुन जाणाऱ्या व्यक्तीचा गोळी लागून मृत्यू, दोन गटातील गोळीबारात सामान्य व्यक्तीचा बळी Description: Pune Firing: पुण्यासारख्या शहरामध्ये गुन्हेगार पुन्हा डोकं वर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. काल पुण्यात दोन गटातील गोळीबारात एका सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...