अखेर राजेंचं ठरलं! मोदी बागेतून थेट मोदींसोबत

पुणे
Updated Sep 12, 2019 | 20:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट शरद पवार यांची भेट घेऊन आपण भाजपमध्ये जात असल्याचे सांगितले आहे. आज पुण्यात शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांची सुमारे पावणे दोन तास बैठक झाली.

udayanraje bhosale
उदयनराजे भोसले 

थोडं पण कामाचं

  • उदयनराजेंनी पवारांना थेट सांगितलं मी चाललो भाजपमध्ये, ठरली प्रवेशाची तारीख 
  • उदयनराजेंचे ठरलं १४ तारखेला करणार भाजपमध्ये प्रवेश
  • १५ तारखेला भाजपच्या महाजनादेश यात्रेत होणार सामील

पुणे : साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट शरद पवार यांची भेट घेऊन आपण भाजपमध्ये जात असल्याचे सांगितले आहे. आज पुण्यात शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांची सुमारे पावणे दोन तास बैठक झाली. या बैठकीत उदयनराजे यांनी शरद पवार यांना उघडपणे आपला निर्णय सांगितले.  येत्या १४ तारखेला दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच १५ तारखेला साताऱ्यात होणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेत उदयनराजे सामील होणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. 

गणेश विसर्जनाच्या दिवशीच आज सकाळी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मोदी बाग येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेण्यासाठी उदयनराजे भोसले आले होते. या भेटीतच त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका दिला आहे.  यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि आमदार शशिकांत शिंदेही उपस्थित होते. यावेळी पवार आणि उदयनराजे यांच्या अडीच तास चर्चा झाली. या बैठकीतील तपशील सुरूवातीला बाहेर आला नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांना थेट आणि स्पष्ट सांगितले की, मी येत्या १४ तारखेला भाजपमध्ये प्रवेश करत आहे. तसेच १५ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत सामील होणार आहे. पण पवार यांनी ही माहिती प्रसार माध्यमांपर्यंत येऊ दिली नाही. 

यावेळी उदयनराजे यांनी पवारांचे आशीर्वाद घेतले. सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी मला भाजपमध्ये जावे लागत असल्याचे थेट शरद पवारांना सांगितले. तुम्ही वडीलधारी आहेत, तुमच्याबद्दल कायम मनात आदर असेल, तुमच्या आशीर्वाद असाच कायम राहू द्या, असे म्हणून शरद पवार यांचा राजेंनी निरोप घेतला होता. 

या भेटीनंतर शशिकांत शिंदे आणि धनंजय मुंडे हे उदयनराजे यांना  गाडीपर्यंत सोडण्यासाठी लिफ्टमधून खाली आले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी सांगितले की, उदयनराजे हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. ते कुठेही जाणार नाही. भाजपने प्रसारमाध्यमातून चुकीच्या बातम्या पसरविण्याचा प्रयत्न केला. जनतेचे लक्ष दुसऱ्या गोष्टीकडे वळवण्यासाठी ही खेळी केल्याचे मुंडे यांनी सांगितले होते. 

पण, यात काहीच तथ्य नव्हते. त्यानंतर सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणाऱ्या धनंजय मुंडे यांनीही याबाबत आपल्या ट्विटर हँडलवरून काहीच ट्विट केले नाही. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उदयनराजे भोसले येत्या १४ तारखेला नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या उपस्थिती भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार आहेत.  काल मुख्यमंत्री आणि उदयनराजे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हे ठरलेले दिसत आहे. त्यामुळे आज आपला निर्णय सांगण्यासाठी उदयनराजे पवारांना भेटायला गेले होते. 

तुम्ही वडीलधारी आहात, मला तुम्ही समजू शकतात. साताऱ्याच्या विकासासाठी मी भाजपमध्ये जात असल्याचे उदयनराजे यांनी शरद पवार यांना सांगितले. 


असा असू शकतो उदयनराजेंचा प्लान 

  1. - आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांना राजीनामा देणार असल्याचे सूचित केले उदयनराजे यांनी 
  2. - आज रात्री किंवा उद्या सकाळी नवी दिल्लीला जाऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे आपल्या खासदारकीचा राजीनामा देतील राजे. 
  3. १४ तारखेला म्हणजे परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत करणार भाजपमध्ये प्रवेश 
  4. १५ तारखेला साताऱ्यातील मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत सामील होणार राजे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...