पुणेकरांची चिंता वाढली, पुण्यात मृतांचा आकडा वाढला

पुणे
पूजा विचारे
Updated Apr 14, 2020 | 17:55 IST

पुण्यात आज अवघ्या काही तासांमध्ये चार कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यानं चिंतेत आणखीन भर पडली आहे. राज्यात सर्वात आधी कोरोनानं शिरकाव केलेल्या पुण्यात आता मृत्यूचं सत्र सुरू झालं आहे.

pune corona virus
पुणेकरांची चिंता वाढली, पुण्यात मृतांचा आकडा वाढला  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • पुण्यात आज अवघ्या काही तासांमध्ये चार कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यानं चिंतेत आणखीन भर पडली आहे.
  • राज्यात सर्वात आधी कोरोनानं शिरकाव केलेल्या पुण्यात आता मृत्यूचं सत्र सुरू झालं आहे.
  • मंगळवारी ससूनमध्ये उपचार घेत असलेल्या चौघांचा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुणेः पुण्यात आज अवघ्या काही तासांमध्ये चार कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यानं चिंतेत आणखीन भर पडली आहे.  राज्यात सर्वात आधी कोरोनानं शिरकाव केलेल्या पुण्यात आता मृत्यूचं सत्र सुरू झालं आहे. मागील आठवडाभरापासून कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. 

मंगळवारी ससूनमध्ये उपचार घेत असलेल्या चौघांचा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व ससून रुग्णालयात उपचार घेत होते. आता मृतांची संख्या आता 38 झाली आहे. मृतांमध्ये घोरपडी गावातील 77 वर्षीय, तर कोंढव्यातील 42 आणि 50 वर्षीय महिलेसह एका 27 वर्षीय तरुणाचा समावेश आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं पुण्यातील वातावरण चिंताजनक बनलं आहे. महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आढळून आलेल्या या शहरात आता कोरोनामुळे मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे.  आज शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडाही वाढला आहे. आणखी चार जणांना लागण झाली असल्याचं आलेल्या रिपोर्टमधून निष्पन्न झालं आहे. यात ससून रुग्णालयातील एका नर्सचाही समावेश आहे.

कोंढव्यातील 50 वर्षीय महिलेवर ससूनमध्ये उपचार सुरू होते. तिला रक्तदाबाचा त्रास होता. तिला करोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. तर पर्वती दर्शन येथील 27 वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाली होती. 12 एप्रिलला त्याला ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. तो मद्याचे अतिसेवन करत होता. यात त्याचे यकृत निकामी झाले होते. त्याचाही आज मृत्यू झाला. 

घोरपडी येथील 77 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला 2 एप्रिलला ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्याचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. रुग्णालयात उपचार सुरू असताना, आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना रक्तदाब आणि किडनीचा आजार होता. कोंढव्यातील एका 40 वर्षीय महिलेला दम्याचा आजार होता. तिलाही करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांना दमा आणि मधुमेह होता. त्यांचाही आज मृत्यू झाला. आज दिवसभरात काही तासांतच चौघांना कोरोनानं बळी गेला आहे. 

पुणे शहरातील आणखी 22 भाग पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही महापैरांनी केली. अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या सर्वांसाठी पुणे पोलिसांनी दिलेले पास 14 एप्रिलऐवजी आता 30 एप्रिलपर्यंत ग्राह्य धरले जाणारेत. शिवाय मुदत वाढवल्याची माहिती नागरिकांना मेसेजद्वारे प्राप्त होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी