40 Students In Shri Vitthal Ashram In Pandharpur Get Food Poisoning : महाराष्ट्रात पंढरपूर येथे श्री विठ्ठल आश्रमातील ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. विद्यार्थ्यांच्या दुपारच्या जेवणामध्ये बासुंदी, कोबीची भाजी, बेसनाचा लाडू, पोळ्या, भजी या पदार्थांचा समावेश होता. जेवण जेवल्यानंतर संध्याकाळी सातच्या सुमारास विद्यार्थ्यांना त्रास होण्यास सुरुवात झाली.
विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब, पोटदुखीचा त्रास होऊ लागला. एका मागून एक विद्यार्थी तब्येत बिघडत असल्याची तक्रार करू लागले. परिस्थिती पाहून श्री विठ्ठल आश्रमाच्या प्रशासनाने ४० जणांना पंढरपूर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले.
अन्नातून विषबाधा झालेल्यांपैकी दहा ते पंधरा जणांची तब्येत गंभीर आहे. या सर्वांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. विषबाधा झालेले सर्व विद्यार्थी श्री विठ्ठल आश्रमामध्ये धार्मिक शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये काही स्थानिक तर काही वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. पळसगाव, निमगाव, हळेगाव, वैजापूर, तळोशी, ढाणगाव दौंड, परभणी, कोल्हापूर , शेळवे पंढरपूर, पाटणे, जालना, सिंदखेड, सावरखेड, नाशिक, ढवळगाव, कोपरगाव, जालना, पैठण, दौंड येथील विद्यार्थी जे श्री विठ्ठल आश्रमात होते त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांवर वेळेत उपचार सुरू झाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाने दिली.