शालेय पोषण आहारात पशुखाद्य? पुण्यातील घटनेने एकच खळबळ

Pune School received cattle fodder instead of mid-day meal: पुण्यातील सरकारी शाळेत मुलांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराऐवजी चक्क पशुखाद्य पुरवठा झाल्याचं समोर आलं आहे. या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. 

A Government school in Pune received cattle fodder instead of mid-day meal for students
शालेय पोषण आहारात पशुखाद्य? पुण्यातील घटनेने एकच खळबळ  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • पुण्यातील हडपसरमध्ये शालेय पोषण आहारात पशुखाद्य दिल्याचा आरोप
  • हडपसरमधील मनपा शाळेत घडला हा प्रकार
  • जनावरांना देण्यात येणारे खाद्य शालेय पोषण आहारात?

पुणे : शालेय विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजने अंतर्गत धान्य वाटप करण्यात येते. मात्र, पुण्यातील महानगरपालिकेच्या शाळेत एक अजब प्रकार उघडकीस आला आहे. येथे विद्यार्थ्यांना पुण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराऐवजी चक्क पशुखाद्य पुरवठा करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. हे वृत्त सर्वत्र पसरताच एकच खळबळ उडाली आहे आणि या प्रकारामुळे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

पुण्यातील हडपसर येथील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ५८ येथील शाळेत शालेय पोषण आहार योजने अंतर्गत धान्याचा पुरवठा करणारी गाडी पोहोचली. मात्र, या गाडीतून जेव्हा हे धान्य बाहेर काढण्यात येत होते त्यावेळी त्या गोण्यांवर चक्क गुरांचे खाद्य असल्याचे फोटो दिसून आले. तसेच त्यामध्ये पशुखाद्य असल्याचंही समोर आलं. या प्रकरणाची माहिती प्रशासनाला देण्यात आल्यावर तात्काळ हे खाद्य जप्त करण्यात आलं.

या संपूर्ण प्रकरणावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना विचारले असता त्यांनी म्हटलं, शालेय पोषण आहार योजने अंतर्गत पुरवले जाणारे धान्य हे राज्य सरकारकडून येते. महानगरपालिका केवळ हे खाद्य वाटप करत असते. ही घटना दुर्भाग्यपूर्ण असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, असे असले तरी शालेय पोषण आहार योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना करण्यात येणारे धान्य वाटप योग्य ते नियोजन करुन विद्यार्थ्यांना घरपोच करण्यात यावे अशा सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी