आता अजित पवारांनी सांगितला मंत्रिपदांचा फायनल फॉर्म्युला

पुणे
रोहित गोळे
Updated Dec 15, 2019 | 00:51 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्रात सत्तेचा नेमका फॉर्म्युला कसा असणार याबाबत माहिती दिली. 

ajit pawar declared mhahrashtra govt power sharing formula in pimpri chichwad   
आता अजित पवारांनी सांगितला मंत्रिपदांचा फायनल फॉर्म्युला  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन जवळजवळ १५ दिवस झाले तरी सत्तेचा नेमका फॉर्म्युला कसा असणार याबाबत कोणतीही स्पष्टता आलेली नव्हता. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत या नव्या आघाडीच्या सत्तेचा फॉर्म्युला स्पष्ट केला आहे. त्यामुळे आता नेमकं चित्र स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीत सर्वाधिक मंत्रिपदं ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली असल्याचं आता निश्चित झालं आहे. आज (शनिवार) अजित पवार पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. 

महाविकास आघाडीत विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असे धरुन एकूण ४५ पदांचं वाटप करण्यात आलं आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक १७ मंत्रिपदं मिळणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, गृहमंत्री पद हे सध्या तरी शिवसेनेकडे असलं तरी त्याबाबत निश्चिती नसल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. कारण आज अजित पवारांना त्याबाबत काही सूचक विधानं केली असल्याचं सांगण्यात येत आहे. 

याचवेळी अजित पवार यांनी आपल्याला कोणकोणती खाती मिळणार आणि त्याचा नेमका फायदा काय होणार हे देखील कार्यकर्त्यांना समजवलं. त्याबाबत बोलताना अजित पवार असं म्हणाले की, 'आजवर आपल्याकडे कधी नव्हती ती खाती आपल्याला मिळणार आहे. अर्थ खातं गेले अनेक वर्ष हे आपल्याकडे होतं. ते आपल्यालाच मिळालं आहे. राज्याची तिजोरी ही या खात्याकडे असते त्यामुळे हे महत्त्वाचं खातं आपल्याला मिळणार आहे. पण याशिवाय गृहनिर्माण सारखं महत्त्वाचं खातं देखील आपल्याला मिळणार आहे. ज्यामुळे शहरी भागात पक्षाचा विस्तार करण्यास नक्कीच फायदा होईल. तसंच गेले अनेक वर्ष आदिवासी विकास हे खातं आपल्याकडे होतं. पण आता त्याऐवजी आपल्याकडे सामाजिक न्याय हे खातं असणार आहे.' असं अजित पवार म्हणाले. 

पाहा महाविकास आघाडीत कुणाला किती मंत्रिपदं मिळणार: 

  1. राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा उपाध्यक्ष पद धरुन एकूण १७ मंत्रिपदं मिळणार 
  2. शिवसेनेला एकूण १५ मंत्रिपदं मिळणार 
  3. काँग्रेसला विधानसभा अध्यक्ष धरुन एकून १३ मंत्रिपदं मिळणार 

'डिसेंबर महिना संपण्याच्या आतच मंत्रिमंडळाचा विस्तार'

दरम्यान, याचवेळी अजित पवार यांनी हे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील महत्त्वाची घोषणा केली. 'मंत्रिमंडळाचा विस्तार हा डिसेंबर महिना संपण्याच्या आतच होईल. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दोन्ही पक्षांचे सर्वोच्च नेते याबाबत अंतिम निर्णय घेतील आणि त्याबाबत योग्य वेळी घोषणा करतील.' असं अजित पवार म्हणाले.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी