खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अजितदादांनी सोडले मौन

भारतीय जनता पक्षाशी अनेक काळापासून नाराज असलेले नेते एकनाथ खडसे यांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशावर दररोज नवनवीन चर्चा होत आहेत.

ajit pawar react on eknath khadse will join NCP
खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अजितदादांनी सोडले मौन 

पुणे : भारतीय जनता पक्षाशी अनेक काळापासून नाराज असलेले नेते एकनाथ खडसे यांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशावर दररोज नवनवीन चर्चा होत आहेत. त्यावर आता पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले मौन सोडले आहे. राजकारण्यांचे आपल्या जीवनात अनेक भेटीगाठी होत असतात, त्यामुळे भेट झाली म्हणजे काही तरी काळंबेरं आहे असं समजू नये, असं अजित दादा म्हणाले.

अजित पवारांच्या हस्ते पुण्यात विधान भवन येथे रुग्णवाहिकेचं लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. राजकारणात अनेकदा भेटीगाठी चालूच असतात. भेट झाली म्हणजे नक्की काही तरी काळंबेरं आहे असा अर्थ होत नाही. असे अजितदादा यावेळी म्हणाले.  भाजप सत्तेत असतानाही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून भाजपच्या नेत्यांना भेटायचो. तुम्ही मला गेली कित्येक वर्ष ओळखता, असंही अजित पवार म्हणाले.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल मला काहीही माहित नाही. जेवढं माहित होतं तेवढं तुम्हाला सांगितलंय, असे म्हणून आपण या विषयापासून दूर असल्याचे सांगत अंग काढून घेतले. 

भाजपात नाराज असलेले एकनाथ खडसे मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहेत. त्यांचा  येत्या १७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश निश्चित मानला जातोय. काही दिवसांपूर्वीच मुक्ताईनगरमध्ये खडसेंनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती, ज्यात पुढील निर्णयावर मंथन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खडसे यांनी या बैठकीबाबत आणि आ यावर थेट काहीही सांगितलेलं नाही. तर राष्ट्रवादीकडूनही मौन बाळगलं जात आहे. त्यामुळे अजित पवार यांनी आपल्याला काहीही माहित नाही, असं स्पष्टपणे सांगितलं.

गेल्या काही वर्षांपासून डावललं जात असल्याचा आरोप करत एकनाथ खडसे भाजपात नाराज आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी अनेकदा थेट नाव घेऊन निशाणाही साधला होता. त्यामुळे भाजपला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचे संकेत एकनाथ खडसे यांनी यापूर्वीच दिले आहेत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी