पुणे : शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटामुळे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार कोसळलं आणि त्यानंतर राज्यात शिंदे सरकार स्थापन झालं. भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन झाल्यावर एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री बनले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हातात घेताच कामालाही सुरुवात केली. त्याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे काही व्हिडिओज सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करण्याच्या सूचना या मुख्यंमंत्री देत असतानाचं व्हिडिओत दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे असे व्हिडिओ जोरदार व्हायरल (Viral Video) होत असून त्यावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी खोचक टोला लगावला आहे.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात पाच डोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या विहिरीतील दूषित पाणी प्यायल्याने ५० जणांची प्रकृती खराब झाली. या घटनेची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून घेतली. तसेच सर्व नागरिकांवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश देतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
#अमरावती जिल्ह्यातील #मेळघाट परिसरात पाच डोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या विहिरीतील दूषित पाणी प्यायल्याने ५० जणांची प्रकृती खराब झाली. या घटनेची माहिती मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून घेतली. या सर्वांवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. pic.twitter.com/GrOVJAyA8C — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 9, 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत, हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला आलेल्या पूराबाबतच्या सद्यस्थितीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून फोनद्वारे घेतली. पूरग्रस्तांची सर्व व्यवस्था करावी तसेच कोणतीही जीवितहानी होणार नाही त्यासाठी प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फोनवरुन देताना दिसत आहेत.
मुख्यमंत्री @mieknathshinde हे दिल्ली दौऱ्यावर असून #हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला आलेल्या पूराबाबतच्या सद्यस्थितीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे घेतली.पूरग्रस्तांची सर्व व्यवस्था करावी तसेच कोणतीही जीवितहानी होणार नाही यास प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले. pic.twitter.com/nUEbPkqr0x — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 9, 2022
एकनाथ शिंदे यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओजवर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, आपल्याला माहिती नाही की, हे तर मी सुरुवातीपासून करत आलो आहे. फक्त मी हे असं कॅमेरा वगैरे लावत नाही.
हे पण वाचा : सोमय्यांकडून मुख्यमंत्र्यांची भेट; शिंदे गटातील यामिनी जाधव, सरनाईकांवरील ईडीची पीडा टळणार?
अजित पवार पुढे म्हणाले, माझं मी काम करत असतो. राज्यातील लोकं मला ओळखतात. मी कुठलंही काम आलं तर लगेच फोन लाव असं म्हणतो. पण फोन लावताना फोन पण लाव आणि कॅमेरा पण लाव असं सांगत नाही असं म्हणत अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.