Loudspeaker Row : रस्त्यावरील नमाज पठण बंदी केल्यानंतर गणेशोत्सव आणि दहीहंडीचे काय? ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंचा सवाल

पुणे
तुषार ओव्हाळ
Updated May 02, 2022 | 14:43 IST

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवा अशी मागणी केली आहे, तसेच रस्त्यावरील नमाज पठणासही राज ठाकरे यांनी विरोध दर्शवला. यावर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आक्षेप घेतला आहे.  जर रस्त्यांवरील नमाज पठण बंद करायचे असेल तर रस्त्यांवरील होणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सवचे काय असा सवाल आनंद दवे यांनी उपस्थित केला आहे.

anand dave
आनंद दवे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवा अशी मागणी केली आहे, तसेच रस्त्यावरील नमाज पठणासही राज ठाकरे यांनी विरोध दर्शवला.
  • यावर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आक्षेप घेतला आहे.  
  • रस्त्यांवरील होणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सवचे काय असा सवाल आनंद दवे यांनी उपस्थित केला आहे.

Anand Dave : पुणे :  राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवा अशी मागणी केली आहे, तसेच रस्त्यावरील नमाज पठणासही राज ठाकरे यांनी विरोध दर्शवला. यावर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आक्षेप घेतला आहे.  जर रस्त्यांवरील नमाज पठण बंद करायचे असेल तर रस्त्यांवरील होणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सवचे काय असा सवाल आनंद दवे यांनी उपस्थित केला आहे. तसेच धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्याचा निर्णय चुकीचा असून यामुळे हिंदू सण आणि उत्सवांवर होईल असेही आनंद दवे म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला आपल्या पत्नीसोबत मुलाखत दिली. तेव्हा राज ठाकरे म्हणाले की रस्त्यावर नमाज पठण केले जाते त्याला प्रतिक्रिया म्हणून हिंदूनी रस्त्यांवर सण साजरे करण्यास सुरूवात केली असे आनंद दवे म्हणाले. जेव्हा मुस्लिम धर्म स्थापनही झाला नव्हता तेव्हापासून हिंदू धर्मात सण आणि उत्सव साजरे करण्याची पद्धत आहे हे राज ठाकरे यांच्या लक्षात नाही. रस्त्यावर नमाज पठण बंद केली तर हिंदूही रस्त्यावर कुठले सण साजरे करणार नाही असेही एक वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते. परंतु राज ठाकरे यांनी आपल्या या भूमिकेचा पुर्नविचार करावा अशी मागणी आनंद दवे यांनी केली आहे. मुस्लिम समाजाने आपल्या प्रथा बंद केल्यानंतर हिंदूनींही आपल्या प्रथा आणि सण साजरे करणे बंद करणे कितपत योग्य आहे? असा सवाल आनंद दवे यांनी विचारला.

मशिदींवरील भोंगे उतरवले पाहिजे अशी मागणी राज ठाकरे यांनी केली, तसेच फक्त मशीदच नव्हे तर सर्व मंदिर आणि इतर धर्मियांच्या स्थळांवरील भोंगे उतरवा अशी मागणीही राज ठाकरे यांनी केली होती. यावर आनंद दवे यांनी ही भूमिका चुकीची असल्याचे म्हटले आहे. नमाज आणि मुस्लिमांचे सण यांना काही मर्यादा आहेत परंतु हिंदूचे अनेक सण वर्षभर कुठे ना कुठे साजरे होत असतात. प्रत्येक गावात वर्षाला जत्रा, उत्सव साजरा केला जातो. अनेक गावांत ग्रामदेवता असते, अनेक ठिकाणी महापुरुष आणि देवतांचे जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते.  या उत्सवात मोठ्या प्रमाणात भोंगे आणि लाऊडस्पीकर लावले जातात. त्यामुळे ही भूमिका चुकीची आहे. तसेच रस्त्यावर नमाज पठण करण्यास पहिल्यापासून हिंदू महासभेने विरोध दर्शवला आहे. परंतु रस्त्यांवरील सर्व सण आणि उत्सवांवर बंदी आणल्यास गणेशोत्सव, आरत्यांचे काय होणार? रस्त्यांवरील होणारी दहीहंडी, नवरात्रोत्सव साजरे करता येणार नाही. देशाचे बहुतांश कायदे हे हिंदूंच्या बाजूचे नसून धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूवर बंधने घातलेली आहेत. राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे हिंदूंच्या सणांवर परिणाम होती, हिंदू समाज अडचणीत येईल अशी भूमिका आनंद दवे यांनी मांडली आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी