'यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी'

पुणे
रोहित गोळे
Updated Oct 19, 2020 | 10:30 IST

Chandrakant Patil Criticized to Yashomati Thakur: राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 

Yashomati Thakur
'यशोमती ठाकूर यांची CM ने मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी'  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, चंद्रकांत पाटील यांची मागणी
  • 'पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी यशोमती ठाकूरांना तुरुंगावासाची शिक्षा झाली आहे.'
  • उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल असल्याची देखील चंद्रकांत पाटलांनी केली टीका 

पुणे: 'कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी', अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे (Bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील याबाबत म्हणाले की, 'न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून यशोमती ठाकूर यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा देणे आवश्यक होते. पण अजूनही त्या पदाला चिकटून राहिल्या आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा', असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला. 

'यशोमती ठाकूर स्वतःहून राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणे गरजेचे आहे. परंतु, मुख्यमंत्री याविषयी काहीच भूमिका घेत नाहीत. आपले पद टिकविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात. राज्याच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांनी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे व यशोमती ठाकूर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे.' असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी यशोमती ठाकूर यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली. 

पाटील पुढे असंही म्हणाले की, 'वरिष्ठ न्यायालयात आपल्याला न्याय मिळेल, असे यशोमती ठाकूर यांचे म्हणणे आहे, तरीही त्यांनी न्यायालयाकडून पुन्हा निर्दोष ठरेपर्यंत मंत्रिपदापासून दूर राहणे आवश्यक आहे. त्यांनी मंत्रिपदावर कायम राहण्यामुळे या निकालाविरुद्धचे त्यांचे अपील व त्याबाबत सरकारी पक्षाकडून मांडली जाणारी भूमिका यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यशोमती ठाकूर अजूनही मंत्रिपदी कायम आहेत, याचा भारतीय जनता पार्टी निषेध करते.'

दरम्यान, आता याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

काय आहे नेमकं प्रकरण: 

राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अॅड यशोमती ठाकूर (Maharashtra Minister Yashomati Thakur) यांना एका जुन्या प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणात न्यायलयाने अॅड यशोमती ठाकूर आणि त्यांच्यासह दोन कार्यकर्त्यांना तीन महिन्यांची शिक्षा (3 months imprisonment) सुनावली आहे. या प्रकरणात न्यायलयाने त्यांना १५ हजार रुपयांचा दंड (Rs 15000 fine) सुद्धा ठोठावला आहे.

२४ मार्च २०१२ रोजी अमरावती येथील अंबादेवी मंदिराजवळ वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यासोबत अॅड. यशोमती ठाकूर यांनी वाद घातला होता. तसेच आपल्याला मारहाण केल्याची तक्रार संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने केली होती. त्यानुसार शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणात न्यायलयाने यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयाने सुनावलेल्या या शिक्षेनंतर अॅड यशोमती ठाकूर यांनी जामिनासाठी अर्ज केला आणि तो मंजूर झाला आहे. तसेच यशोमती ठाकूर यांनी उच्च न्यायलयात धाव घेतली आहे. या प्रकरणावर भाष्य करताना अॅड यशोमती ठाकूर यांनी म्हटलं, "या प्रकरणी आम्ही उच्च न्यायलयात दाद मागितली आहे आणि तेथे आम्हाला नक्कीच न्याय मिळेल याचा विश्वास आहे. एका महिलेच्या मागे आता पूर्ण भाजप लागेल. भाजप विरुद्ध माझी वैचारिक लढाई आहे. आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला तरी विचारांची लढाई आम्ही लढत राहणार."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी