पिंपरी चिंचवड : भारतीय जनता पार्टीचे आमदार लक्ष्मण जगताप (bjp mla lakshman jagtap) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला तुफान गर्दी पाहायला मिळाली. यात कोरोनाच्या कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आले नसल्याचे दिसून आले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये (pimpari chinchavad) कोरोना (corona) रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मात्र नेते मंडळीकडूनच मोठमोठे कार्यक्रम घेतले जात असल्याने कोरोनावर आळा कसा बसणार हा मोठा प्रश्न आहे.
दरम्यान, भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मिस अँड मिसेस फॅशन शो च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाला अनेकांनी गर्दी केली होती. त्याचबरोबर सदर कार्यक्रमात पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांच्यासह भाजपच्या नगरसेविकेनेही हजेरी लावली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचा पाहायला मिळाला.
आमदार महोदयांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या अनेक प्रेक्षकांनी तोंडाला मास्क देखील लावला नसल्याचे पाहायला मिळाले. वेळी सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला होता. दरम्यान, कार्यक्रमावेळी महापौरांसह बहुतांश नगरसेविकांनी विनामास्क रॅम्पवॉक देखील केलं. तसेच या या कार्यक्रमाला मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेही उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमाला कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड पोलिसांकडून परवानगी देण्यात आली असल्याची माहिती आहे. मात्र, सभागृहाच्या फक्त पन्नास टक्के उपस्थिती ठेवणं अनिवार्य होतं. परंतु आमदार महोदयांचा कार्यक्रम म्हणजे राडा तर होणारच! आणि प्रत्यक्षात तस झालंही, कार्यक्रमाला संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून आलं. पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहे. मात्र महापौर आणि नगरसेवकांकडूनच नियमांची पायमल्ली केली जात आहे. याला आळा जर नाही घातला तर पूर्वीसारखी परस्थिती पुन्हा उद्भवू शकते.
दरम्यान पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे, रात्री ११ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाच्या दिवसेंदिवस वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यानुसार शहरात ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. यावेळी काही नागरिकांवर कारवाई देखील करण्यात येत आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून, काही ठिकाणी तर लॉकडाऊन करण्यात आले आहे. पुण्यामध्ये विवाह सोहळ्यासाठी फक्त २०० लोकांना परवानगी दिली जाईल, असं नुकतंच प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र धनंयज महाडिक यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याला मात्र ७०० ते ८०० लोकं उपस्थित असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. त्यामुळे नियम फक्त सर्वसामान्य जनतेलाच का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.