पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ आता सोशल मिडियावरती चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर भाजपचे नेते आक्रमक झाले असून, संपूर्ण राज्यात पटोले यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आंदोलन करताना पहायला मिळत आहेत. त्याचबरोबर पुण्यात अनेक ठिकाणी फ्लेक्स लावले गेले आहेत. भाजपच्या वतीने लावण्यात आलेल्या या फ्लेक्सवरती नाना पटोले यांना खुले आव्हान देण्यात येणारे मजकूर लिहिण्यात आले आहेत. दरम्यान, राज्यात विविध ठिकाणी नाना पटोले यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
नाना आपण पुण्यात कधी येतात ते सांगा आम्ही आपल्या स्वागताला उत्सुक आहोत. आम्ही स्वागत कसे करतो ते आपले सहकारी पक्षातील मित्र असणाऱ्या जीतूहीनला विचारा असे म्हणत धीरज घाटे यांनी नाना पटोले यांना खुलं आव्हान दिले आहे. सदर फ्लेक्सबाजीही भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक धिरज घाटे यांनी नाना पटोले यांच्या विरोधात करत त्यांना खुलं आवाहन केलं आहे.
दरम्यान, नागपूरमध्ये भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही आणि एफआयर (FIR) ची प्रत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनमधून जाणार नसल्याची भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली होती. यावेळी त्यांनी नाना पटोले यांच्यावर ७ गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे. भंडारा, नाशिक अमरावती, नाशिक, नागपूरमध्ये या ठिकाणी नाना पटोले यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मी आता मागील ३० वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. त्यावर आता त्यांचे स्पष्टीकरण आले आहे. या व्हिडिओनंतर भाजपने नाना पटोले यांच्या विरोधात रान उठवले आहे. विविध नेत्यांनी प्रतिक्रिया देऊन नाना पटोले यांच्या निषेध केला आहे.