पुणे : राज्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सहकारी गृहनिर्माण सोसायटी (Cooperative Housing Society) नोंदणीबाबत राज्याच्या (State)सहकार विभागाने (Department of Co-operation) मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सोसायटीची नोंदणी करतानाच कन्व्हेअन्ससाठीची (Convenience) आवश्यक सर्व कागदपत्रे सादर करावीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना कन्व्हेअन्स (अभिहस्तांतरण) करताना होणारा त्रास कायमचा थांबण्याची शक्यता आहे.
कन्व्हेअन्ससाठीची आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतर पुढील चार महिन्यांमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी कन्व्हेअन्स करून नाही दिला. तर सोसायटीने केवळ अर्ज व सोसायटीचा ठराव दिल्यास 'डीम्ड कन्व्हेअन्स'ची (मानीव अभिहस्तांतरण) प्रक्रिया पूर्ण करून जमीन सोसायटीच्या नावावर केली जाईल. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी याबाबतचे आदेश सर्व उपनिबंधकांना दिले आहेत. दरम्यान, बांधकाम व्यावसायिक सोसायटी नोंदवून सोसायटीचा कारभार सदनिकाधारकांकडे सोपवितात. सोसायटी नोंदविल्यानंतर पुढील चार महिन्यांमध्ये कन्व्हेअन्स करून देणे आवश्यक असते. मात्र, कन्व्हेअन्स करून देण्यास बांधकाम व्यावसायिकांकडून टाळाटाळ केली जाते. सद्यस्थितीत बांधकाम व्यावसायिक कन्व्हेअन्स करून देत नसल्याने अनेक सोसायट्यांनी 'डीम्ड कन्व्हेअन्स'चे अर्ज उपनिबंधकांकडे सादर केले जातात. त्यासाठी अत्यावश्यक असलेली कागदपत्रे गोळा करताना सदनिकाधारकांची तारांबळ उडते. अनेकदा बांधकाम व्यावसायिकांकडून कागदपत्रे देण्यास नकार दिला जातो. त्यामुळे आता बांधकाम व्यावसायिक हे सोसायटी नोंदविण्यासाठी उपनिबंधक कार्यालयात आल्यानंतर त्यांच्याकडून सर्व कागदपत्रे घेतली जाणार आहेत.
बांधकाम व्यावसायिकांनी इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर सोसायटीकडे हस्तांतरण करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक बांधकाम व्यावसायिकांकडून ही प्रक्रिया करण्यात येत नसल्याने सहकार विभागाकडून 'डीम्ड कन्व्हेअन्स' करून देण्यात येते. सोसायटीचे हस्तांरण न झाल्यास भविष्यात सोसायटीचा पुनर्विकास करायचा असेल, तर चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वाढवून मिळणे, हक्काचा पुरावा म्हणून मिळणारे प्रॉपर्टी कार्ड किंवा सदनिकेची खरेदी-विक्री व्यवहार होत नाहीत. मात्र, डीम्ड कन्व्हेअन्स झाल्यास सदनिकाधारकांना सर्व हक्क प्राप्त होतात; तसेच संबंधित बांधकाम व्यावसायिकाचा हक्क संपुष्टात येतो.