Pune rain: पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, ४० ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलवले, पाहा VIDEO

पुणे
सुनिल देसले
Updated Oct 15, 2020 | 00:17 IST

Pune Rain Updates: पुण्यात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून रस्ते, वस्त्या जलमय झाले आहेत.

Pune heavy rain
पुण्यात मुसळधार पाऊस  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • पुण्यात गेल्या काही तासांपासून जोरदार पाऊस सुरू 
  • मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचण्यास सुरूवात 
  • काही ठिकाणी वीज गायब, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

Maharashtra Rain updates: पुणे जिल्ह्यात (Pune District) गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) पडत आहे. मुसळधार पावसामुळे पुण्यातील काही भागांत पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. यासोबतच खडकवासला आणि उजणी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसात काही भागांतील वीज पुरवठा सुद्धा खंडीत झाला आहे. मुसळधार पावसामुळे पुणे-सोलापूर महामार्गावर पाणी साचल्याने हा मार्ग काही काळासाठी बंद झाला होता.

४० ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलवले 

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात असलेल्या निमगाव केतकी या गावात पुराच्या पाण्यात काही नागरिक अडकले होते. पुराच्या पाण्यात ग्रामस्थ अडकल्याची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले. या ग्रामस्थांपैकी ४० जणांना सुरक्षितस्थळी प्रशासनाने हलवले आहे तर इतर १५ जणांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

सुरक्षित ठिकाणी थांबा, घराबाहेर पडू नका 

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं, "पुणे शहरात गेल्या काही तासांपासन पडत असलेल्या पावसाने आता वेग घेतला असून आणखी काही तास सलग पाऊस पडण्याची शक्यता आहे. आपण सुरक्षित ठिकाणी थांबा, घराबाहेर पडू नका!". 

यानंतर त्यांनी आणखी एक ट्वीट करत अत्यावश्यक क्रमांक शेअर केले आहेत. यामध्ये पुणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिकेचा क्रमांक आहे.

तेलंगणावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा १४ ऑक्टोबर रोजी पश्चिमेकडे सरकला आहे. कमी दाबाचा पट्टा पुढे पश्चिम-वायव्येकडे सरकत जाऊन पुढील १२ तासांत कमी होणार आहे. त्यानंतर कमी ताबाचा पट्टा पश्चिम वायव्येकडे सरकून १६ ऑक्टोबर रोजी अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्याकडे येईल. महाराष्ट्रात अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

कोकणासह गोव्यात अतिवृष्टीची शक्यता

१५ ऑक्टोबर रोजी कोकणासह गोव्यात अतिवष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर कर्नाटकात पुढील १२ तासांत ३०-४० किलोमीटर ते ५० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी