पुण्यातील नृत्यांगना विशाखा काळेची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे
Updated Oct 08, 2020 | 14:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

कोरोना विषाणूच्या जागतिक संकटामुळे जगभरातील सर्वच देशांना फटका बसला आहे. यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे भारतातील सर्वच उद्योगधंद्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मनोरंजन क्षेत्राला याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

vishakha kale
विशाखा काळेची आत्महत्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • कोरोनाच्या संकटामुळे काम मिळत नसल्याने नृत्यांगनेची आत्महत्या
  • पुण्यात विशाखा काळे हिने नैराश्यापोटी घेतला गळफास
  • अनेक कार्यक्रम आणि रिअॅलिटी शोमध्ये केले होते काम

पुणे: कोरोनाच्या संकटामुळे (Corona pandemic) सगळे व्यवहार बंद असल्याचा सर्वाधिक फटका मनोरंजन क्षेत्राला (entertainment industry) बसला आहे. अनेक कलाकारांना केलेल्या कामाचे मानधन (no remuneration) मिळालेले नाही तर अनेकांना नवी कामेही (no work for artists) मिळताना दिसत नाहीत. यामुळे या क्षेत्रावरील कोरोनाचे सावट अद्याप हटलेले नाही. याच परिस्थितीने आता आणखी एक बळी घेतला आहे. पुण्यातील (Pune) नृत्यांगना (famous dancer) विशाखा काळे (Vishakha Kale) हिने घरची आर्थिक परिस्थिती आणि कामाची कमी याला कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (suicide by hanging) केली आहे. मंगळवारी तिने हे टोकाचे पाऊल उचलले. घरची आर्थिक चणचण (financial crisis) आणि भविष्यात उत्पन्नाचे काही साधन दिसत नसल्याने ती काही काळापासून नैराश्यात होती.

कोरोनाच्या संकटामुळे काम मिळत नसल्याने नृत्यांगनेची आत्महत्या

विशाखाची लहान बहीण प्रियांकाही नृत्यांगना आहेत. या दोघी बहिणी नृत्याचे कार्यक्रम करीत असत. त्यांच्या आईवडिलांसोबत त्या पुण्यात राहात. त्यांचे वडील अंध असून आई खासगी शाळेत सेविका आहे. त्यामुळे घर चालवण्याची संपूर्ण जबाबदारी या दोघी बहिणींवर होती. पण कोरोनाच्या संकटामुळे या बहिणींचे कार्यक्रम बंद झाले आणि उत्पन्नाचे साधन थांबले. यामुळे विशाखा नैराश्याची शिकार बनली. मंगळवारी संध्याकाळी घरातील इतर सर्वजण बाहेर गेलेले असताना तिने गळफास घेतला.

पुण्यात विशाखा काळे हिने नैराश्यापोटी घेतला गळफास

विशाखाची बहीण प्रियंका हिने सांगितले की गेल्यावर्षी विशाखाचा अपघात झाला होता आणि चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी एक लाख रुपयांचा खर्च आला होता. अशा परिस्थितीत कोरोनामुळे कार्यक्रम मिळणे बंद झाल्याने आर्थिक परिस्थिती आणखीच खालावली आणि यामुळेच विशाखा नैराश्यात गेली.

अनेक कार्यक्रम आणि रिअॅलिटी शोमध्ये केले होते काम

विशाखा आणि प्रियंका या दोघींनी महाराष्ट्राची गौरवगाथा, गर्जा हा महाराष्ट्र, महाराष्ट्राची लोकधारा असे अनेक कार्यक्रम आणि रिअॅलिटी शोजमध्ये भाग घेतला आहे. विशाखाने जिजाऊ या मालिकेतही काम केले होते. पण गेले सहा महिने हे सर्व बंद असल्याने निर्माण झालेल्या आर्थिक चणचणीच्या आणि अस्थिर भविष्याच्या चिंतेने विशाखाने हे टोकाचे पाऊल उचलले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी