HSC Results Date : बारावीच्या निकालाची तारीख निश्चित, लवकरच होणार घोषणा, वाचा निकालाबाबतची सविस्तर माहिती

पुणे
अमोल जोशी
Updated Jun 06, 2022 | 10:10 IST

कोरोना काळानंतर पहिल्यांदाच झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना निकालाची तारीख जाहीर केली आहे.

HSC Results Date
बारावीच्या निकालाची तारीख ठरली  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • बारावीचा निकाल 10 जून रोजी जाहीर होणार
  • लवकरच पत्रकार परिषद घेऊन औपचारिक घोषणा
  • यंदा निकालाची टक्केवारी घसरण्याची शक्यता

HSC Results Date : राज्यातील इयत्ता बारावीच्या निकालांची तारीख जाहीर कऱण्यात आली आहे. येत्या 10 जून रोजी बारावीचे निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर केले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून हा निकाल जाहीर करण्यात येणार असून दरवर्षीप्रमाणे  www.maharesult.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्याना आपला निकाल पाहता येईल. पुण्यात पत्रकारांशी बोलताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. 

सर्व तयारी पूर्ण

पुण्यात एक कार्यक्रमासाठी आलेल्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती माध्यमांना दिली. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. लवकरच पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधिकृत माहिती सरकारच्या वतीनं जनतेला दिली जाणार आहेत. 

अधिक वाचा - Corona Update : राज्यात वाढतायत कोरोनाचे रुग्ण, शाळा वेळेत सुरू होणार का? शिक्षणमंत्र्यांच्या विधानानंतर चर्चेला सुरुवात

किती वाजता लागणार निकाल?

शिक्षणमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना निकालाची तारीख जाहीर केली असली तरी नेमका किती वाजता निकाल जाहीर होणार, हे मात्र सांगितलेलं नाही. आतापर्यंतचा ट्रेंड पाहता साधारणपणे सकाळी 11 वाजता निकाल जाहीर केला जातो आणि दुपारी 1 वाजता तो ऑनलाईन उपलब्ध होतो. त्यानंतर विद्यार्थी लॉग इन करून आपापला निकाल पाहू शकतात आणि गुणपत्रिका डाऊनलोड करून घेऊ शकतात. 

2021 साली कोरोनाच्या उद्रेकामुळे बारावीच्या परीक्षाच रद्द करण्यात आल्या होत्या. इंटर्नल इव्हॅल्युएशन पॉलिसीच्या आधारे विद्यार्थ्याना पास करण्यात आलं होतं. 2020 सालीदेखील काही पेपर झाल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. 

अधिक वाचा - सोमवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोरोना संकटावर होणार चर्चा, निर्बंध लागू होण्याची शक्यता

दरवर्षी लाखो विद्यार्थी होतात पास

महाराष्ट्रातून दरवर्षी साधारण 14 लाख विद्यार्थी बारावीची परीक्षा देत असतात. 2021 साली 99.63 टक्के एवढा बारावीचा निकाल लागला होता. परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यांकन पद्धतीने विद्यार्थ्यांना उत्तीर्ण कऱण्यात आल्यामुळे निकालाची टक्केवारी सर्वाधिक होती. त्यापूर्वी म्हणजे 2020 साली 90.66 टक्के विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. 

यंदा उत्तीर्णांची टक्केवारी घटणार?

या वर्षी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी कमी होण्याचा अंदाज अनेक शिक्षणतज्ज्ञांनी वर्तवला आहे. यंदा बारावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षात नीटपणे कॉलेजमध्येच जाता आलेलं नाही. शेवटचे काही महिने वगळता विद्यार्थ्यांना घरीच अभ्यास करावा लागला आहे. शिवाय गेल्या दोन वर्षातील कोरोना उद्रेकामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या दर्जावरही परिणाम झाला आहे. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात महाविद्यालयेही बंद आणि इंटरनेटचीही व्यवस्थित सुविधा नाही, अशा परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे शक्य झालेले नाही. या सगळ्याचा एकत्रित परिणाम निकालाच्या टक्केवारीवर दिसण्याची शक्यता शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी