Narayan Rane on Eknath Shinde : योग्य निर्णय घेतलास, नाहीतर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता! नारायण राणेंचं खळबळजनक ट्विट

पुणे
अमोल जोशी
Updated Jun 21, 2022 | 12:35 IST

शिवसेनेचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जााणाऱ्या भाजप खासदार नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. एकनाथ शिंदेंना उद्देशून त्यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

Narayan Rane on Eknath Shinde
एकनाथ शिंदेंचा आनंद दिघे झाला असता - राणे  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • योग्य वेळेत निर्णय घेतलास, नाहीतर तुझा आनंद दिघे झाला असता - नारायण राणे
  • राणेंच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात खळबळ
  • नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Narayan Rane on Eknath Shinde : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडावर भाजप नेते नारायण राणे यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिलेली आहे. शाब्बास एकनाथजी, योग्य वेळेत निर्णय घेतला. नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता असं ट्विट नारायण राणेंनी केलं आहे. राणेंच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे नारायण राणे एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अधिकच आक्रमक होण्याची ही चिन्हं मानली जात आहेत. 

काय आहे संदर्भ?

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत वेळोवेळी अनेक चर्चा राजकीय वर्तुळात होत असतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांचे काही मुद्द्यांवर मतभेद होते, असंही सांगितलं जातं. तर या मतभेदांचा आनंद दिघेंच्या मृत्यूशी कुठलाही संबंध नसल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी वारंवार स्पष्टही केलं आहे. मात्र नारायण राणेंनी आता पुन्हा दिघेंचा उल्लेख केल्यामुळे वर्तमान राजकारणासह इतिहासाची पानंदेखील उलटली जाण्याची चिन्हं आहेत. 

अधिक वाचा - Eknath Shinde News: एकनाथ शिंदेंच्या नाराजीची ही आहेत प्रमुख कारणे 

राणेंना नेमकं काय म्हणायचं आहे?

आनंद दिघेंचा मृ्त्यू आणि शिवसेनेतील राजकारण हा गेल्या काही वर्षात चर्चेचा विषय बनला आहे. दिघेंना शेवटच्या काळात भेटणाऱ्या काही नेत्यांपैकी नारायण राणे हे एक नेते असल्याचं सांगितलं जातं. मला त्याबाबत तोंड उघडायला लावू नका, असंही नारायण राणेंनी यापूर्वी अनेकदा म्हटलं आहे. मात्र आता शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी आनंद दिघेंचा संबंध नारायण राणेंनी जोडला आहे. तुमचा आनंद दिघे झाला असता, असं नारायण राणे म्हणत आहेत. नारायण राणेंना नेमकं काय म्हणायचं आहे, याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे. 

अधिक वाचा - Eknath Shinde Not Reachable : शिवसेनेत उभी फूट, पुढे काय होणार? फडणवीस, राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष

मुख्यमंत्र्यांना राणेंचा टोला

मुख्यमंत्र्यांना एक दिवस तरी विश्रांती घेऊ द्या, अशी प्रतिक्रिया नारायण राणेंनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. एकनाथ शिंदेंविषयी प्रश्न विचारला असता, त्याबाबत जास्त काही सांगायचं नसतं. मग नॉट रिचेबल राहून उपगोय काय, असा सवाल त्यांनी केला. 

ट्विटवर प्रतिक्रियांचा पाऊस

नारायण राणेंच्या या ट्विटवर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडत आहे. मातोश्रीची आणि ठाकरेंची गुलामी बास झाली, असं काहीजण म्हणत आहेत. तर विठ्ठलाने योग्य न्याय केला अशा प्रतिक्रियाही काही जण देत आहेत. काहींनी हे पेल्यातलं वादळ असून लवकरच सर्व काही सुरळीत होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. एकूणच नारायण राणेंच्या या ट्विटनं राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी