मुलाचे शाही लग्न भोवले, भाजपच्या माजी खासदारावर गुन्हा दाखल

पुणे
अजहर शेख
Updated Feb 23, 2021 | 08:40 IST

Filed a fir against former BJP MP Sanjay Mahadik: माजी खासदार धनंजय महाडिक, लक्ष्मी लॉन्सचे मालक विवेक मगर आणि लॉन्सचे मॅनेजर निरुपल केदार या तिघांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे

Filed a fir against former BJP MP Sanjay Mahadik
मुलाचे शाही लग्न भोवले, भाजपच्या माजी खासदारावर गुन्हा दाखल   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • २०२० च्या कलम ११ अंतर्गत आयपीसी १८८, २६९, २७१ अंतर्गत गुन्हा दाखल
  • लग्नात सोशल डिस्टन्सिंगही पाळण्यात आलं नाही
  • शाही विवाह सोहळ्याला ७०० ते ८०० लोक उपस्थित असल्याचा अंदाज

पुणे: कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक (dhananjay mahadik ) यांच्या मुलाचा पुण्यात शाही विवाह सोहळा दोन दिवसापूर्वी झाला होता. महाडिक यांच्या मुलाच्या लग्नाची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात झाली होती. मात्र या लग्न सोहळ्यात कोरोना (corona) प्रतिबंधक नियमाचे उल्लंघन करण्यात आले असल्याचे पाहायला मिळाले होते. आता याच प्रकरणी धनंजय महाडिक यांच्यासह तीन जणांवर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये (police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शाही लग्न सोहळ्यात ७०० ते ८०० हून अधिक जण उपस्थित असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे सोशल मिडीया वरती अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आणि बड्या लोकांना सूट? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.

लक्ष्मी लॉन्सच्या मालक आणि मॅनेजर विरोधातही गुन्हा दाखल

दरम्यान, कोरोनाचे नियम उल्लंघन केल्याप्रकरणी कोल्हापुरचे माजी खासदार धनंजय महाडिक, लक्ष्मी लॉन्सचे मालक विवेक मगर आणि लॉन्सचे मॅनेजर निरुपल केदार या तिघांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राष्ट्रीय आपत्कालीन प्रशासन अधिनियम २००५ कलम ५१ आणि महाराष्ट्र कोव्हिड धोरण योजना २०२० च्या कलम ११ अंतर्गत आयपीसी १८८, २६९, २७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल डिस्टन्सिंगही पाळण्यात आलं नाही

माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा पुण्यात पार पडला. मुलगा पृथ्वीराज महाडिक आणि वैष्णवी असं लग्न झालेल्या दाम्पत्य नाव आहे. दरम्यान, लग्नात कोरोना नियम कुठेही पाळले गेल्याचं दिसलं नाही. वधू वरांना स्टेजवर भेटायला जात असतानाही अनेकांनी मास्क घातला नसल्याचं दिसून आलं. तसंच सोशल डिस्टन्सिंगही पाळण्यात आलं नाही.

या दिग्गज नेत्यांनी लावली हजेरी

पुण्यात पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार, (sharad pawar) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थित दर्शवली होती. मात्र यातील काही नेत्यांनीच मास्क घालणं टाळलं असल्याचे पाहायला मिळाले. तसंच या नेत्यांसमोरच सोशल डिस्टन्सिंगचा देखील पुरता फज्जा उडाला होता. त्यामुळे नियम घालून देणारेच नियमांच उल्लंघन करत असतील तर सर्वसामान्य जनतेकडून काय अपेक्षा करणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

शाही विवाह सोहळ्याला ७०० ते ८०० लोक उपस्थित असल्याचा अंदाज

दरम्यान, राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून, काही ठिकाणी तर लॉकडाऊन करण्यात आले आहे. पुण्यामध्ये विवाह सोहळ्यासाठी फक्त २०० लोकांना परवानगी दिली जाईल, असं नुकतंच प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र धनंयज महाडिक यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याला मात्र ७०० ते ८०० लोकं  उपस्थित असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. त्यामुळे नियम फक्त सर्वसामान्य जनतेलाच का? असा सवाल उपस्थित केला जात होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी