दिलासादायक बातमीः पुण्यात एकाच कुटुंबातील 5 जण कोरोनामुक्त

पुणे
पूजा विचारे
Updated Apr 10, 2020 | 16:05 IST

राज्याची राजधानी मुंबई आणि पुण्यात रुग्णांची संख्या जास्त आहे. मुंबईप्रमाणे पुण्यातही परिस्थिती भीषण आहे. त्याचदरम्यान एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात आज 5 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

corona virus
दिलासादायक बातमीः पुण्यात एकाच कुटुंबातील 5 जण कोरोनामुक्त 

थोडं पण कामाचं

  • राज्यात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.  
  •  राज्याची राजधानी मुंबई आणि पुण्यात रुग्णांची संख्या जास्त आहे.
  • पुण्यात आज 5 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

पुणेः  देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. राज्यात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.  सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे.  राज्याची राजधानी मुंबई आणि पुण्यात रुग्णांची संख्या जास्त आहे. मुंबईप्रमाणे पुण्यातही परिस्थिती भीषण आहे. त्याचदरम्यान एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात आज 5 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

पुण्यातील एकाच कुटुंबातील पाच कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. या पाचही जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पुणे शहरात भीतीचं वातावरण आहे. मात्र, पाच रुग्ण बरे झाल्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनाची लागण झाल्यामुळे या पाचही जणांना उपचारासाठी नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. गेले 14 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचाराचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर म्हणजे 14 दिवसांनंतर त्यांच्या पुन्हा टेस्ट करण्यात आल्या. या टेस्टमध्ये  सर्व जण निगेटिव्ह आढळून आले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. या पाचही जणांच्या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या. त्यामुळे या पाचही जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता पुणे शहरात एकूण 23 जण कोरोनामुक्त झालेत. आज सकाळीच या पाचही जणांना नायडू हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
 

सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी

इस्लामपुरचे आणखी 12 कोरोनाबाधित रुग्ण हे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे 26 पैकी आता 22 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा कमी होऊन 4 वर आला आहे. त्यामुळे सांगलीकरांसह प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. या 22 रुग्णांच्या दोन्ही टेस्टचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला आहे. सांगलीचे सिव्हिल सर्जन डॉ. संजय साळुंखे यांनी याबाबत माहिती दिली आहे.   या 22 कोरोनामुक्त रुग्णांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. मात्र, नियमानुसार त्यांना काही दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावं लागेल. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ही एक सकारात्मक घटना घडली आहे.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधील कोरोनाबाधितांचा आकडा 26 पोहोचला होता. गुरुवारी 16 कोरोनाबाधित रुग्णांची दुसरी चाचणी घेण्यात आली होती. रात्री उशिरा त्यापैकी 12 रुग्णांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आलेत. आता केवळ चार कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यांच्यावर मिरज येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णांमध्ये एका दोन वर्षांच्या चिमुरड्याचा समावेश आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी