सत्ता स्थापन करणार नाही, आम्ही विरोधातच बसणार: शरद पवार

पुणे
पूजा विचारे
Updated Oct 26, 2019 | 19:32 IST

आम्ही विरोधातच बसणार असल्याचा पुनरूच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेनं विरोधात बसण्याचं जनमत दिलं आहे.त्यामुळे पक्ष विरोधातच बसेल असं पवारांनी म्हटलं आहे.

NCP Sharad Pawar
सत्ता स्थापन करणार नाही, आम्ही विरोधातच बसणार: शरद पवार  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • आम्ही विरोधातच बसणार असल्याचा पुनरूच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
  • राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेनं विरोधात बसण्याचं जनमत दिलं आहेः शरद पवार
  • सत्तास्थापनेत आमची कोणतीही भूमिका नसेल, आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणूनच काम करू, असं ठाम मत पवारांनी व्यक्त केलं. 

आम्ही विरोधातच बसणार असल्याचा पुनरूच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेनं विरोधात बसण्याचं जनमत दिलं आहे. त्यामुळे पक्ष विरोधातच बसेल असं पवारांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला सत्तास्थापनेचा जनादेश मिळाला आहे. सत्तास्थापनेत आमची कोणतीही भूमिका नसेल, आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणूनच काम करू, असं ठाम मत पवारांनी व्यक्त केलं. 

आज बारामतीत शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी आम्ही सत्ता स्थापन करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 

दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनीही जनतेनं दिलेला कौल आहे. तो आम्हाला मान्य आहे. कुणाकडून कोणताच प्रस्ताव आलेला नाही. जर त्यांनी कुठला प्रस्ताव दिला तर दिल्ली हायकमांड याबद्दल निर्णय घेईल. आमचे निर्णय दिल्लीत घेतले जातात, असं थोरात यांनी स्पष्ट केलं आहे. 

दरम्यान शरद पवार यांनी हे मत मांडण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आपलीही भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची आघाडी ही विरोधातच बसणार असल्याचं मत व्यक्त केलं. भाजप शिवसेना युतीला लोकांनी कौल दिला आहे.  

आम्हाला कौल दिलेला नाही. त्यामुळे मी हे सांगू इच्छितो की आम्ही विरोधी पक्षातच बसणार. एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करणार असल्याचं पटेल यांनी स्पष्ट केलं.

सत्तेचा उन्माद जनतेला पसंद पडला नाही- शरद पवार

या निवडणुकीत दिसलं की भाजप - सेनेच्या लोकांचा सत्तेचा उन्माद जनतेला पसंद पडला नाही.मुळात जमिनीवर पाय ठेवून चालले की, त्यांचे स्वागत होते. परंतु त्यांनी सीमा ओलांडली होती अशी जोरदार टिका पवार यांनी निकालानंतर घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत केली.सांगण्यात आले होते २२० पार मात्र लोकांनी ते स्वीकारलेले नाही. लोकांनी निर्णय दिला आहे असा टोला शरद पवार यांनी भाजपाला लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेने दिलेला निर्णय विनम्रपणे स्वीकारला आहे तो आम्ही स्वीकारतो आहे. महाआघाडीतील सर्व पक्षांनी मनापासून परस्परांना सहकार्य केले. राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी प्रामाणिक प्रयत्न केला त्याबद्दल सर्वांचे शरद पवार यांनी आभार मानले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी