Gaur Spotted : कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील चांदोली राष्ट्रीय उद्यानातील परिसरात रानगव्यांचा वावर वाढला आहे. शिराळा तालुक्यातील चांदोली चे अभयारण्य संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. जिल्ह्याचे राज्य व देशभरातील अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. वन खात्यामार्फत या ठिकाणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र प्रकल्प राबविण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये या अभयारण्य बद्दल मोठे आकर्षण आहे.
शेजारच्या अनेक जिल्ह्यात आढळून आलेले बिबटे, माकडं, हिंस्र प्राणी तसेच रानगवे या राष्ट्रीय उद्यानात वन खात्यामार्फत पकडून त्यांना या ठिकाणी आणून सोडले आहे. या अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर रानगवे आढळून येत आहेत. सध्या नुकतीच मान्सूनची रिमझिम या परिसरात सुरू झाल्याने जंगलात तसेच डोंगरदऱ्यांमध्ये छोटी छोटी हिरवळ होऊ लागली आहे. परिसरातील शेतामध्ये अनेक गावात शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली आहे त्याचे कोवळे अंकुर येत आहेत. या कोवळ्या मोडावर हे रानगवे हल्ला करून या पिकाची नासधूस करत आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग हैराण झाला आहे. आता शेतकऱ्यांची शेतामध्ये लगबग सुरू झाली असून त्यांच्यावर देखील अनेक वेळा या रानगव्याकडून हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वनखात्याने त्याचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.