गृहमंत्र्यांचा उजवा हात असलेला कार्यकर्त्याची शिवसैनिकाला संपवून टाकण्याची धमकी- शिवाजी आढळरावांचा गंभीर आरोप

पुणे
भरत जाधव
Updated Jan 03, 2022 | 08:24 IST

Threat To  Shiv Sainik   माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी आरोप केला आहे की,  गृहमंत्र्यांचा उजवा हात असलेला कार्यकर्ता शिवसैनिकाला माझा व्हिडीओ स्टेटसला ठेवला म्हणून संपवून टाकण्याची धमकी देतो.

 Shivaji Adhalrao patil
शिवाजी आढळराव पाटील (संग्रहित छायाचित्र)  |  फोटो सौजन्य: फेसबुक
थोडं पण कामाचं
  • आमचं पक्षाला इतकंच सांगणं आहे की राज्यात आघाडी सरकार आहे, तर तुमचं चालू द्या, फक्त आम्हाला जिल्ह्यात जगू द्या, - माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील
  • आम्हाला फक्त शिवसैनिक म्हणून सुखाने जगू द्या. आम्हाला संपवू नका, आम्हाला मारू नका

Threat To  Shiv Sainik  पुणे:  राज्यातील महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांच्या मनामध्ये एकमेंकांविषयी चांगलं मत नसल्याचं दिसून येत आहे. तिनही पक्षातील नेते पदाधिकारी एकमेंकांवर विविध आरोप करत असतात. आता शिवसेनेचे नेते (Shiv Sena leader) आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील (Former MP Shivaji Adhalrao Patil) यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांच्या जवळील व्यक्तीवर आरोप केले आहेत. 

माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी आरोप केला आहे की,  गृहमंत्र्यांचा उजवा हात असलेला कार्यकर्ता शिवसैनिकाला माझा व्हिडीओ स्टेटसला ठेवला म्हणून संपवून टाकण्याची धमकी देतो. या घटनेची माहिती देत असताना आढाळराव म्हणाले की, आमचं पक्षाला इतकंच सांगणं आहे की राज्यात आघाडी सरकार आहे, तर तुमचं चालू द्या, फक्त आम्हाला जिल्ह्यात जगू द्या, असंही नमूद केलं. ते झी २४ तास वृत्तवाहिनीशी बोलत होते.

पुढे बोलताना शिवाजी आढळराव पाटील म्हणाले, “याच जिल्ह्यात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा उजवा हात असलेल्या कार्यकर्त्याने चार दिवसांपूर्वी माझ्या एका कार्यकर्त्याला माझा व्हिडीओ स्टेटसला ठेवला म्हणून धमकावलं. त्याला मारण्याची धमकी दिली. तुला गावात राहायचं का, तुला संपवून टाकू अशी धमकी गृहमंत्र्यांचा उजवा हात असलेला कार्यकर्ता करतो आहे. आमचं पक्षाला इतकंच सांगणं आहे की राज्यात आघाडीचे सरकार आहे तर तुमचं चालू द्या, फक्त जिल्ह्यात आम्हाला जगू द्या, आम्हाला मारू नका. आघाडीने याबाबत मित्रपक्षांना सांगावं.”

“आघाडीतील घटक पक्षाने आम्हाला पुण्यात संपवण्याचा डाव करू नये, आम्ही तुमच्याकडे, सरकारकडे काही मागत नाही. आमची कुठलीच मागणी नाही, आम्हाला फक्त शिवसैनिक म्हणून सुखाने जगू द्या. आम्हाला संपवू नका, आम्हाला मारू नका,” असं शिवाजी आढळराव म्हणाले.

शर्यत डोळ्यात खुपली

“आता आम्हाला विकास करू द्या, निधी द्या या मागण्याही करायचं सोडून दिलं आहे. ही बैलगाडी शर्यत बंद करण्याचं कारण काहीच नव्हतं. फक्त शिवसेना नेता शिवाजीराव आढळराव यांनी त्यांच्या गावात शर्यत भरवली हे त्यांच्या डोळ्यात खुपलं म्हणून त्यांनी स्थगिती दिली. कुणाच्या डोळ्यात खुपतं हे सांगण्याची गरज नाही. संपूर्ण जिल्हा आणि राज्याला हे माहिती आहे,” असं आढळरावांनी सांगितलं.

“माझा शिवसेनेचा खेड तालुक्याचा पंचायत समिती सभापती सहा महिन्यांपासून तुरुंगात सडतो आहे. त्याच्यावर नाहक ३०७ चा गुन्हा दाखल केला. त्यावर डॉक्टरांचं प्रमाणपत्र देखील नाही. त्याला जामीन मिळू नये म्हणून राष्ट्रवादीचे आमदार आणि इतर नेते दबाव टाकत आहेत. ही गोष्ट मी माझ्या नेत्यांना वेळोवेळी कानावर घातली. त्यांनीही पाहिजे तशी मदत केली. परंतु हे चित्र एका बाजूला आहे. शिवसेनेच्या माझ्या सभापतीने काय घोडं मारलं होतं. त्याच्यावर खोटा गुन्हा का दाखल केला. त्याचं संपूर्ण घर तुरुंगात टाकलं,” असंही आढळरावांनी नमूद केलं.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी