गिरीश महाजनांच्या अडचणीत वाढ; पुणे पोलिसांनी जळगावातून ताब्यात घेतली टेम्पोभर कागदपत्रे

पुणे
भरत जाधव
Updated Jan 11, 2022 | 11:27 IST

Girish Mahajan : जळगावातील मराठा विद्या प्रसारक मंडळातील (Maratha Vidya Prasarak Mandal jalgaon) वादाच्या प्रकरणात पुण्यातील कोथरूड पोलीस (Kothrud Police) ठाण्यात गिरीश महाजनांविरोधात (Girish Mahajan) गुन्हा दाखल झाला आहे.

 Girish Mahajan
महाजन अडचणीत; जळगावातून पोलिसांनी कागदपत्रांनी भरला टेम्पो 
थोडं पण कामाचं
  • पुणे पोलिसांचे पथक दोन दिवसांपूर्वी जळगावात दाखल झाले आणि त्यांनी अनेक ठिकाणी छापेमारी केली.
  • पोलिसांनी सर्व कागदपत्रे पुण्याला आणली आहेत.
  • जळगावातील मराठा विद्या प्रसारक मंडळ या संस्थेशी संबंधित कागदपत्रे ही भोईटे आणि आणखी एक आरोपी तानाजी यांच्या घरी मिळून आली आहेत.

Pune police seized document From Jalgaon :  पुणे : जळगावातील मराठा विद्या प्रसारक मंडळातील (Maratha Vidya Prasarak Mandal jalgaon) वादाच्या प्रकरणात पुण्यातील कोथरूड पोलीस (Kothrud Police) ठाण्यात गिरीश महाजनांविरोधात (Girish Mahajan) गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर चौकशीसाठी पुणे पोलिसांची (Pune Police) टीम जळगावात (Jalgaon) पोहोचली आणि त्यांनी अनेक ठिकाणी छापेमारी सुद्धा केली. या छापेमारीत पुणे पोलिसांच्या टीमने तब्बल एक टेम्पो भरुन कागदपत्रे जप्त केली आहेत. या कागदपत्रांमध्ये नेमकं असं काय आहे, हे सध्या तरी सांगता येत नसले तरी या प्रकरणात आता भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

संस्थेसंदर्भातल्या वादातून महाजन आणि भोईटे यांच्या विरोधात अपहरणाचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर चौकशी सुरु झाली आहे. या चौकशीसाठी गेलेल्या पथकाकडून मोठी कारवाई करण्यात आल्यानंतर गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पुणे पोलिसांच्या टीमने जळगावातून कागदपत्रे जप्त केली असून पोलिसांनी ही सर्व कागदपत्रे पुण्याला आणली आहेत. कोथरुड पोलीस ठाण्यात ही सगळी कागदपत्रे आणण्यात आली आहेत. जळगावातील मराठा विद्या प्रसारक मंडळ या संस्थेशी संबंधित कागदपत्रे ही भोईटे आणि आणखी एक आरोपी तानाजी यांच्या घरी मिळून आली आहेत. ही कागदपत्रे संस्थेत असणं अपेक्षित होतं मात्र, भोईटे आणि आणखी एका व्यक्तीच्या घरात आढळून आली आहेत. या कागदपत्रांतून मोठे लीड मिळण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. 

काय आहे प्रकरण?

जळगाव येथील महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या वादातून अ‍ॅडवोकेट विजय भास्कर पाटील यांनी माजी जलसंपदा मंत्री, आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासह भोईटे गटावर निंभोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा गुन्हा कोथरुड पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला होता. या गुन्ह्यातील भोईटे गटाच्या नऊ जणांवर मकोका लावण्यात आला आहे. 

पुणे पोलिसांची जळगावात झाडाझडती

पुणे पोलिसांचे पथक दोन दिवसांपूर्वी जळगावात दाखल झाले आणि त्यांनी अनेक ठिकाणी छापेमारी केली. पोलिसांच्या पथकाने भोईटे कुटुंबीयांसह इतर ठिकाणी झाडाझडती घेतली. महत्त्वाचे धागेदोरे व दस्तावेज पोलिसांकडून हस्तगत केले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गिरीश महाजन हे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असून गिरीश महाजन यांना मराठी विद्या प्रसारक संस्था हडप करत होते. मात्र त्यांना तसं न करता आल्याने त्यांनी आपल्याला त्रास दिल्याचा आरोप या प्रकरणातील फिर्यादी अ‍ॅडवोकेट विजय पाटील यांनी केला आहे.

पुण्यात संस्थेचे कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. ते पुण्यात आल्यानंतर त्यांना शिवीगाळ करत दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसंच त्यांना गाडीत जबरदस्तीने बसवत सदाशिव पेठेत असलेल्या एका फ्लॅटवर नेले. त्या ठिकाणी मारहाण करत गळ्याला आणि पोटाला चाकू लावला. फिर्यादी यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीलाही त्यांनी याठिकाणी डांबले असल्याचा आरोप करण्यात आले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी