सर्वच साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करा - चंद्रकांत पाटील

पुणे
रोहन जुवेकर
Updated Oct 23, 2021 | 19:35 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात जाहीर केलेल्या सर्व ६५ साखर कारखान्यांच्या विक्रीची अवश्य चौकशी करा. - चंद्रकांत पाटील

investigate sales of all sugar factories says chandrakant patil
सर्वच साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करा - चंद्रकांत पाटील 
थोडं पण कामाचं
  • सर्वच साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करा - चंद्रकांत पाटील
  • विक्रीमध्ये महत्त्वाची भूमिका असलेल्या राज्य सहकारी बँकेची आणि त्या बँकेचे संचालक असलेल्या अजित पवार यांचीही चौकशी होणे आवश्यक
  • मनसेसोबत भाजपाची युती होण्याची सुतराम शक्यता नाही

पिंपरी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात जाहीर केलेल्या सर्व ६५ साखर कारखान्यांच्या विक्रीची अवश्य चौकशी करा. केवळ जरंडेश्वरची चौकशी करा आणि उरलेल्या ६४ कारखान्यांची करू नका अशी आमची भूमिका नाही, असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिले. ते पिंपरी येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. investigate sales of all sugar factories says chandrakant patil

चंद्रकांत पाटील म्हणाले की, जरंडेश्वर साखर कारखान्याचे प्रकरण काळा पैसा पांढरा करण्याचे आहे व त्याची चौकशी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी करत आहे. उर्वरित साखर कारखान्यांचे प्रकरणही मनी लाँडरिंगचे असेल तर त्याचीही चौकशी करावी. उपलब्ध माहितीनुसार इतर कारखान्यांची विक्री कमी किंमतीला झाल्याची तक्रार आहे. त्याची चौकशी करताना त्या विक्रीमध्ये महत्त्वाची भूमिका असलेल्या राज्य सहकारी बँकेची आणि त्या बँकेचे संचालक असलेल्या अजित पवार यांचीही चौकशी होणे आवश्यक आहे. या गैरव्यवहाराला मौन संमती देणाऱ्या त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांची आणि मदत करणाऱ्या नेत्यांचीही चौकशी करावी.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी त्यांना धमकीचा फोन आल्याची तक्रार केली आहे, त्याविषयी पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे नवाब मलिक यांनी केवळ तक्रार करण्यापेक्षा राजस्थानमधील सरकारच्या मदतीने धमकी देणाऱ्याचा शोध घेऊन त्याला शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करावेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत भाजपाची युती होईल का, असे एका पत्रकाराने विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, संपूर्ण देश एक आहे, अशी भाजपाची भूमिका असून मनसेची परप्रांतियांची भूमिका भाजपाला मान्य नाही. त्यामुळे मनसेसोबत भाजपाची युती होण्याची सुतराम शक्यता नाही.

संभाजी ब्रिगेडसोबत भाजपाची युती होण्याचा काहीही प्रस्ताव आलेला नाही. त्याबाबत आपण केवळ वर्तमानपत्रातून वाचले. असा प्रस्ताव आला तरीही भाजपाची संभाजी ब्रिगेडशी युती होण्याची शक्यता आपल्याला वाटत नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने विजयी व्हावे यासाठी स्वतः पक्षाध्यक्ष शरद पवार यांना यावे लागले. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहीत पवारही प्रयत्न करत आहेत. पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टी किती भक्कम आहे, याचे हे उदाहरण आहे. शहरातील परिस्थिती हाताळण्यास भाजपाचे नेतृत्व सक्षम आहे, असा टोला त्यांनी हाणला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी