Kiran Gosavi arrested: किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात, अटकेची प्रक्रिया सुरू

पुणे
भरत जाधव
Updated Oct 28, 2021 | 10:03 IST

Kiran Gosavi arrested : मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणातील (Mumbai Cruise Drugs case) पंच किरण गोसावी यांना अखेर पुणे पोलिसांनी (Pune police) ताब्यात घेतले आहे.

Kiran Gosavi arrested by Pune police
Kiran Gosavi arrested: किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पंच प्रभाकर साईलच्या (Prabhakar Sail) आरोपांमुळे या प्रकरणाला अनेक वळण मिळाले आहे.
  • पंच प्रभाकर साईल यांच्या गौप्यस्फोटानंतर या प्रकरणातील दुसरे पंच आणि साधीदार किरण गोसावी याची अटक अटळ होती.
  • प्रभाकर साईलने माध्यमांसमोर येत गौप्यस्फोट केल्यापासूनच किरण गोसावी फरार होता.

Kiran Gosavi arrested : पुणे : मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणातील (Mumbai Cruise Drugs case) पंच किरण गोसावी यांना अखेर पुणे पोलिसांनी (Pune police) ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांनी दावा केला आहे की, किरण गोसावीने (Kiran Gosavi) आत्मसमर्पण (Surrender) केलेले नसून आम्ही आमच्या इंटलिजेंसच्या आधारे त्याला अटक केली आहे.  

 पंच प्रभाकर साईलच्या (Prabhakar Sail) आरोपांमुळे या प्रकरणाला अनेक वळण मिळाले आहे. साईलच्या आरोपांनंतर किरण गोसावी चर्चेत आले. आर्यन खानला ज्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे, त्या मुंबई क्रूझ ड्रग्स (Mumbai Cruise Drug Case) प्रकरणात किरण गोसावी पंच आहे. गोसावीचा अंगरक्षक असलेल्या प्रभाकर साईलने माध्यमांसमोर येत गौप्यस्फोट केल्यापासूनच किरण गोसावी फरार होता. तो लखनौमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्त सकाळी 11 वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. 

पंच प्रभाकर साईल यांच्या गौप्यस्फोटानंतर या प्रकरणातील दुसरे पंच आणि साधीदार किरण गोसावी याची अटक अटळ होती. पुणे पोलिसांचे पथक गोसावीला अटक करण्यासाठी लखनौला रवाना झाले होते. गोसावीवर आतापर्यंत चार गुन्हे दाखल आहेत. वेगवेगळ्या प्रकरणांच्या तपासासाठी पोलीस त्याचा शोध घेत होते. फसवणूक प्रकरणी गोसावीविरोधात पुणे पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे. सोमवारी सायंकाळी गोसावीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये तो आत्मसमर्पण करण्यासाठी लखनौ पोलिसांकडे गेल्याची माहिती मिळाली होती. मात्र लखनौ पोलिसांनी गोसावीला अटक करुन घेण्यास नकार दिल्याचेही म्हटले जात होते. इतर ठिकाणी सरेंडर होण्याचा सल्ला लखनौ पोलिसांनी दिला होता. 

 गोसावीची ऑडिओ क्लिप व्हायरल?

रविवारी प्रभाकर साईल यांनी अनेक गौप्यस्फोट केले. त्याच्या गौप्यस्फोटानंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येऊ लागले. त्यानंतर किरण गोसावीची एक व्हायरल क्लिप समोर आली होती. यामध्ये तो लखनौ पोलिसांना मला आत्मसमर्पण व्हायचंय, असं म्हणत असल्याचे कळत होते तर पोलीस अधिकारी सरेंडर करून घेण्यास गोसावीला स्पष्टपणे नकार देत असल्याचे ऐकायला येतं होतं. येथे का सरेंडर करायचं आहे? असा प्रश्न पोलीस अधिकारी गोसावीला विचारत होते.

आपल्याला येथील पोलीस स्टेशन जवळ आहे, यामुळे सरेंडर करायचं आहे, असं गोसावी त्या संबधित अधिकाऱ्याला म्हणत होता. तर इथे सरेंडर करून घेणार नाही, दुसरीकडे जा, असं सांगत पोलीस अधिकारी किरण गोसावीला नकार देताना ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे. गोसावी लखनौमध्ये असल्याचं समजताच पुणे पोलिसांचे पथक तात्काळ रवाना झाले होते. मुंबईतील क्रूझवरील अंमली पदार्थ पार्टी प्रकरणात पंच आणि साक्षीदार राहिलेल्या गोसावी याच्या विरोधात फसवणूक प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याप्रकरणी पुणे पोलीस त्याला अटक करण्यासाठी रवाना झाले होतं. 

किरण उर्फ के. पी. गोसावी नेमका कोण?

किरण गोसावी हा परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्स रिक्रूटमेंट कंपनीचा मालक असल्याची माहिती आहे. के. पी. जी. ड्रीम्स कंपनीचं मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी याची ओळख आहे. गोसावी स्वत:च्या वाहनावर पोलिसांची पाटी लावून फिरताना कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय नवाब मलिक यांनीही तसा दावा केला होता.

गोसावीचा आहे फसवणुकीचा धंदा 

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनवलेलं आहे. याच किरण गोसावीने अनेक तरुणांची फसवणूक करून त्यांना परदेशात नोकरी देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. 

पुण्यातील तरुणाची फसवणूक

गोसावीने पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाची 2018 मध्ये फसवणूक केल्याचा आरोप आहे. मलेशियात नोकरी लावण्याच्या आमिषाने किरण गोसावी आणि शेरबानो कुराशी यांनी चिन्मयची तीन लाखांना फसवणूक केली होती. त्यानंतर 2018 मध्ये दोघांवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याच गुन्ह्यात पुणे पोलिसांनी शेरबानो कुरेशीला मुंबईतून अटक केली.

पालघरमधील दोन तरुणांचीही फसवणूक

पालघर जिल्ह्यातील एडवण येथील दोन तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन तरुणांना परदेशात नोकरीनिमित्त पाठवण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांची गोसावींनी फसवणूक केल्याचा दावा केला जात आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी