Maharashtra Kesari : सातारा : श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुलात 64 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे अजिंक्यपद कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील यांनी पटकविले. महाराष्ट्र केसरी कुस्तीची मानाची चांदीची गदा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई व नामांकित मल्ल यांच्या हस्ते पृथ्वीराज पाटील यांना देऊन गौरवण्यात आले आहे.
साताऱ्यातील छत्रपती शाहू क्रीडा संकुलात 64 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने मुंबईचा विशाल बनकर याचा 5-4 असा पराभव केला. पहिल्या राऊंड मध्ये बनकर याने 4 गुणांची बढत घेतली होती. पण ही आघाडी मोडून पृथ्वीराज पाटील याने आक्रमक खेळ करत 5 गुण घेतले. पृथ्वीराज हा प्रथमच या स्पर्धेसाठी उतरला होता. आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने चंदेरी गदा पटकावली.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ६४व्या #महाराष्ट्र_केसरी स्पर्धेला उपस्थित राहून विजेत्या पृथ्वीराज पाटील याला मानाची गदा देऊन सन्मानित केले. pic.twitter.com/BDQUQ0ocmN
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 9, 2022
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित व जिल्हा तालीम संघ, सातारा यांच्या सहकार्याने 64 व्या वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2021-2022 च्या अंमित सामन्याचे आयोजन श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुलात करण्यात आले होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दिपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, बाळासाहेब लांडगे, साहेबराव पवार, दिपक पवार, विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह आजी माजी कुस्तीपटू उपस्थित होते.
राज्यातील कुस्ती खेळाचा नावलौकिक एका नव्या उंचीवर पोहचावा यासाठी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद, सातारा जिल्हा तालीम संघ, कुस्ती खेळणारे मल्ल आणि त्यांचे वस्ताद यांना लागेल ती मदत करण्याची तयारी असल्याचे यासमयी बोलताना स्पष्ट केले. pic.twitter.com/5ODbIINPwr
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 9, 2022
यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कुस्ती या खेळाला महाराष्ट्रात मोठी परंपरा आहे. कुस्ती या खेळात महाराष्ट्रातील मल्लांनी ऑलिंपिक पदक मिळवून महाराष्ट्राचे नाव जगात व्हावे यासाठी राज्यातील मल्लांना शासनामार्फत सहकार्य केले जाईल. महाराष्ट्र केसरी कुस्तीचा अंतिम सामना उत्साहात होत आहे. महाराष्ट्रात अनेक ताकतीचे मल्ल घडले आहेत. निवृत्त झालेल्या मल्लांनी नवीन मल्ल घडविण्यासाठी पुढे यावे. तरुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे. मल्ल होणे हे सोपे नाही यासाठी मेहनत, आहाराबरोबरच कुस्तीतील डावपेच शिकावे लागतात. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा साताऱ्यात होत आहे याचा अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.