पुणे : पुण्यातून थरकाप उडवणारा अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. पुणे-अहमदनगर महामार्गावरील (Pune-Ahmednagar Highway) शिरूरमध्ये ही दुर्घटना घडली आहे. हा अपघात 10 तारखेला रात्री 11.25 च्या सुमारास मौजे बजरंगवाडी या ठिकाणी झाला आहे. महामार्गावरील डिव्हायडर तोडून कारविरुद्ध बाजूला जात एका खासगी लक्झरी बसला धडकली. धडक झाल्यामुळे एक खासगी प्रवासी वाहतूक करणारी बस पलटी झाली. पलटी झाल्यानंतर ही बस हॉटेलमध्ये शिरली असून या अपघातात 25 जण जखमी झाले आहेत.
पुणे-अहमदनगर महामार्गावर एका कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी डीव्हायडर तोडत समोरून येणाऱ्या एक खासगी ट्रॅव्हल्सच्या बसला धडकली. ही बस नगरच्या दिशेनं येत होती. धडक झाल्यान बस पलटी होऊन एका हॉटेलमध्ये घुसली. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर लक्झरी बसमधील चालकासह 22-25 जण जखमी झाले आहेत. यातील 5जण गंभीर असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. धडक जोरात असल्याने बसचंदेखील नियंत्रण गेलं. त्यामुळे अहमदनगरच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावरील रॉयल पॅलेस हॉटेलच्या मुख्य दारात ही बस 100 ते 200 फूट अंतर घसरत हॉटेलच्या परिसरात घुसली होती. ही दृष्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.