...तोवर सरकारला स्वस्थ बसू देणार नाही: चंद्रकांत पाटील

पुणे
रोहित गोळे
Updated Oct 12, 2020 | 17:49 IST

राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनाबाबत भाजपने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी पुण्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार  निषेध केला.

Bjp
...तोवर सरकारला स्वस्थ बसू देणार नाही: चंद्रकांत पाटील  |  फोटो सौजन्य: Times Now

पुणे: 'राज्यातील महिलांवरील (women) अत्याचाराच्या (atrocities) घटना दिवसेंदिवस वाढत आहेत , मात्र महाआघाडी सरकार (maha vikas aghadi government) ढिम्म बसून आहे. अशा असंवेदनशील सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभर आंदोलन केले जात आहे. राज्यातील महिलांना जोवर सुरक्षित असल्याची भावना निर्माण होणार नाही तोवर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते महाआघाडी सरकारला स्वस्थ बसू देणार नाहीत.' असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी सोमवारी दिला. महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या विरोधात भाजपातर्फे आयोजित राज्यव्यापी निषेध कार्यक्रमात पुणे येथे सहभागी होताना पाटील यांनी हा इशारा दिला.

भाजपतर्फे सोमवारी राज्यभर महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष उमाताई खापरे, भाजपा प्रदेश सरचिटणीस देवयानी फरांदे, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, आशिष शेलार, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा तसेच पक्षाचे प्रदेश स्तरावरील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. 

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'महाआघाडी सरकार सत्तेत आल्यापासून महिलांवर अत्याचाराची मालिकाच सुरु आहे. अल्पवयीन मुली, बालिकांवरही निर्घृण अत्याचार होत आहेत. मात्र एवढे अत्याचार होऊनही राज्य सरकार या अत्याचाराच्या घटनांना रोखण्यासाठी काहीच हालचाल करत नाही. म्हणूनच या सरकारला जागं करण्यासाठी भाजपाने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यकर्ते महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना रोखण्यासाठी कडक उपाय योजेपर्यंत भाजपा कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत.'

महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे म्हणाल्या की, 'बालिका , अल्पवयीन मुली यांच्यावर अत्याचार करून त्यांच्या हत्या करण्याच्या घटना राजरोस घडत असताना राज्यकर्ते मात्र स्वस्थ बसून आहेत. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरलेला नाही. कोविडवरील उपचारासाठी सुरु करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रात महिलांवर अत्याचार, विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना रोखण्यास अपयशी ठरलेल्या आघाडी सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी हे आंदोलन आहे.'

दरम्यान, आता विरोधी पक्षाच्या या आंदोलनाची राज्य सरकार कशाप्रकारे दखल घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी