CM Eknath Shinde: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत शिंदे गटातील इतरही आमदार हे पुण्यात उपस्थित आहेत. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांचा सुद्धा पुणे दौरा सुरू आहे. आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे आमने-सामने येणार का ? असा सवाल उपस्थित होत असतानाच पुण्यातून एक वेगळीच घटना समोर आली. शिंदे गटाचे समर्थक आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. शिवसैनिकांनी उदय सामंत यांच्या गाडीला घेराव घातला त्याचवेळी कुणीतरी त्यांच्या गाडीवर दगड भिरकावला. या हल्ल्यात उदय सामंत यांच्या गाडीची काच फुटली आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. (Maharashtra CM Eknath Shinde first reaction on shivsainik attacked on uday samant car in pune)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, गाडीवर दगड मारुन पळून जाणे ही मर्दानगी नाही. कायदा-सुव्यवस्था पाहण्याचं काम काम सरकारचं, पोलिसांचं आहे. त्यामुळे जे कोणी हे कृत्य केलं आहे त्याच्यावर पोलीस कारवाई करतील. या संदर्भात मी अधिक माहिती घेत आहे. हा भ्याड हल्ला आहे. कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याचं काम सर्वांनी केलं पाहिजे. भडकाऊ भाषण करुन कुणाला चिथवण्याचं काम कोणी करत असेल तर पोलीस कायदेशीर कारवाई करतील.
उदय सामंत यांच्या गाडीला घेराव घालण्यात आला आणि त्याच दरम्यान त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. pic.twitter.com/80DkH7T3v8 — Timesnowmarathi (@timesnowmarathi) August 2, 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे समर्थक आमदार हे पुण्यात आहेत. माजी मंत्री उदय सामंत हे कात्रज परिसरातून आपल्या गाडीने जात असताना संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला. त्यानंतर कोणीतरी उदय सामंत यांच्या गाडीवर दगड भिरकावला. ही घटना पुण्यातील कात्रज चौकात घडली.
अधिक वाचा : Eknath Shinde अडचणीत; औरंगाबादमध्ये तक्रार दाखल, वाचा नेमकं काय आहे प्रकरण
त्याच परिसरात आदित्य ठाकरे यांचीही जाहीर सभा होती. आदित्य ठाकरे यांच्या सभेनंतर त्या परिसरातून उदय सामंत हे आपल्या गाडीने निघाले असताना आक्रमक शिवसैनिकांनी नारेबाजी करत त्यांच्या गाडीला घेराव घातला.
गाडीवर दगड भिरकावल्याने उदय सामंत यांच्या गाडीची काच फुटली आहे. उदय सामंत हे सुखरूप आहेत. मात्र, गाडीतील एका व्यक्तीला दगड लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी उदय सामंत हे पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचंही वृत्त समोर येत आहे.