पुणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केली आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. मात्र, आता एका प्रकरणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अडचणीत येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणूक लढवताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीत तफावत असल्यासं सांगत पुणे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात सुनावणी करताना पुणे कोर्टाने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे कोर्टाने दिलेल्या या आदेशामुळे आता एकनाथ शिंदे हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली आहे. २००९, २०१४, २०१९ अशा तिन्ही वेळा याच मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवत विजय मिळवला. या निवडणुकीवेळी त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीमध्ये तफावत असल्याचं सांगत त्यांच्याविरोधात पुणे कोर्टात याचिका दाखल करण्यात आली.
वकील समीर शेख यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत म्हटलं आहे की, एकनाथ शिंदे यांच्या प्रतिज्ञापत्रात शिक्षण, मालमत्ता, वाहनाच्या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीत तफावत आहे. पुणे कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची दखल कोर्टाने घेतली आहे.
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेली शेतजमीन आणि इमारतीची माहिती लपवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. २००९ आणि २०१४ च्या शपथपत्रांमध्ये एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्नीकडे शेतजमीन नसल्याचं म्हटलं होतं. पण, २०१९ च्या शपथपत्रात त्यांच्या पत्नीने ठाणे जिल्ह्यातील चिखलगाव येथे सर्वे नंबर ८४४, ८४५ ही जमीन ६ ऑगस्ट २०१९ मध्ये खरेदी केल्याचं म्हटलं आहे. यासोबतच २०१४ च्या शपथपत्रात त्यांच्या पत्नीकडे वाणिज्य इमारत नसल्याचं म्हटलं होतं. पण २०१९ च्या शपथपत्रात त्यांच्या पत्नीकडे ठाण्यातील वागळे इस्टेट इथं ००७ प्लॉट नंबर बी ५१ येथे वाणिज्य इमारत २० नोव्हेंबर २००२ रोजीच खरेदी केल्याचं म्हटलं आहे.
हे पण वाचा : गुरुपौर्णिमेच्या दिवशी CM एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
एकनाथ शिंदे यांनी २०१४ च्या शपथपत्रात आरमाडा गाडी ही ८ लाखांना खरेदी केल्याचं म्हटलं होतं. तर २०१९ च्या निवडणुकीवेळी दाखल केलेल्या शपथपत्रात ही गाडी ९६ हजार ७२० रुपयांना खरेदी केल्याचं नमूद केलं. २०१४ च्या निवडणुकीत स्कॉर्पिओ गाडी ११ लाखांना खरेदी केल्याचं म्हटलं तर २०१९ च्या निवडणुकीवेळी ही गाडी १ लाख ३३ हजारांना खरेदी केल्याचं नमूद केलं. तर २०१४ ला बोलेरो गाडी ६ लाख ९६ हजार ३७० रुपयांना आणि २०१९ च्या शपथपत्रात हिच गाडी एक लाख ८९ हजार ७५० रुपयांना खरेदी केल्याचं म्हटलं.