सहकारमंत्री बाळासाहेब पाटील कोरोना पॉझिटिव्ह

Co-Operative Minister Balasaheb Patil tested corona positive महाराष्ट्राचे सहकारमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोना झाला

Maharashtra Co-Operative Minister Balasaheb Patil tested corona positive
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील कोरोना पॉझिटिव्ह 

थोडं पण कामाचं

  • सहकारमंत्री बाळासाहेब पाटील कोरोना पॉझिटिव्ह
  • महाराष्ट्रात १ लाख ५१ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण
  • खासदार नवनीत राणा, त्यांचे पती रवी राणा आणि त्यांच्या कुटुंबातील १४ सदस्यांना कोरोना

कराडः महाराष्ट्राचे सहकारमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोना झाला (Maharashtra Co-Operative Minister Balasaheb Patil tested corona positive) आहे. त्यांच्यावर कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांना कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पाटील यांची प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्यासारखे काही नसल्याचे त्यांनी ट्वीट करुन सांगितले.

बाळासाहेब पाटील यांनी मागील दोन आठवड्यात त्यांच्या संपर्कात आलेल्यांना खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना चाचणी करुन घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कोरोनाची लक्षणे आढळली अथवा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तर वैद्यकीय सल्ल्याने क्वारंटाइन होऊन उपचार घ्या, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

याआधी अशोक चव्हाण, अस्लम शेख, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, शंकरराव गडाख, संजय बनसोड, अब्दुल सत्तार यांना कोरोना झाला होता. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे हे सर्वजण बरे झाले. 

खासदार नवनीत राणा, त्यांचे पती रवी राणा आणि त्यांच्या कुटुंबातील १४ सदस्य अशाप्रकारे राणा कुटुंबातील १६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. राणा कुटुंबातील सदस्यांवर उपचार सुरू आहेत.  खासदार नवनीत राणा यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. नवनीत राणा यांचे सासूसासरे आणि पती यांना नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. 

महाराष्ट्रात १ लाख ५१ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण

महाराष्ट्रात १४ ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार, ५ लाख ७२ हजार ७३४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी ४ लाख १ हजार ४४२ जण बरे झाले आहेत तर १९ हजार ४२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना झालेल्या ३१० जणांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात १ लाख ५१ हजार ५५५ कोरोना रुग्ण आहेत. सर्व कोरोना रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.०९ टक्के आहेत. कोरोना रिकव्हरी रेट ७० टक्क्यांपेक्षा जास्त असणे ही दिलासा देणारी बाब असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. त्यांनी परिस्थिती आणखी सुधारावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

भारतात ६ लाख ७१ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

भारतात आतापर्यंत २५ लाख ३० हजार ९४३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी ६ लाख ७१ हजार ६९३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना झालेल्यांपैकी १८ लाख १० हजार ७९ जण बरे झाले आहेत. देशात कोरोनामुळे ४९ हजार १७१ जणांचा मृत्यू झाला आहे.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती गंभीर

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (८४), उत्तर प्रदेशचे मंत्री चेतन चौहान आणि गायक एस पी बालसुब्रह्मण्यम या प्रसिद्ध व्यक्तींना कोरोना झाला आहे. चिंतेची बाब म्हणजे या तिघांची प्रकृती गंभीर आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या माजी राष्ट्रपतींच्या मेंदूत रक्ताची गाठ झाली होती. शस्त्रक्रिया करुन ही गाठ काढण्यात आली. मात्र माजी राष्ट्रपती कोमात गेले. ते अद्याप कोमातून बाहेर आलेले नाही. सध्या माजी राष्ट्रपती व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्यावर दिल्लीच्या लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम (७४) यांच्यावर चेन्नईच्या एमजीएम हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. बालसुब्रह्मण्यम व्हेंटिलेटरवर आहेत. तसेच उत्तर प्रदेशय सरकारचे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू चेतन चौहान (७२) यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. चेतन चौहान सध्या व्हेंटिलेटरवर आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी