महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये १९ फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत सक्तीचे

पुणे
Updated Feb 12, 2020 | 19:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये येत्या १९ फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत संक्तीचे करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या कामकाजाची सुरूवात राष्ट्रगीत गायनाने व्हावी असे निर्देश सर्व महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.

Maharashtra government to make national anthem compulsory in all colleges from 19th February
महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये १९ फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत सक्तीचे  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये येत्या १९ फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत संक्तीचे करण्यात आले आहे.
  • महाविद्यालयाच्या कामकाजाची सुरूवात राष्ट्रगीत गायनाने व्हावी असे निर्देश सर्व महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.
  • दिवसाच्या कामकाजाची सुरूवात राष्ट्रगीताने करण्याबाबतचे निर्देश देणारे पत्र सर्व महाविद्यालयांना पाठवण्यात आले आहे.

पुणे: राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये येत्या १९ फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत संक्तीचे करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या कामकाजाची सुरूवात राष्ट्रगीत गायनाने व्हावी असे निर्देश सर्व महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. ही माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली.

शाळांप्रमाणेच आता महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्येही राष्ट्रगीत गुंजणार आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी १९ फेब्रुवारी रोजी म्हणजेच शिवजयंतीपासून होईल असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. दिवसाच्या कामकाजाची सुरूवात राष्ट्रगीताने करण्याबाबतचे निर्देश देणारे पत्र सर्व महाविद्यालयांना पाठवण्यात आले आहे. या पत्राला सर्वच महाविद्यालयांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही सामंत यांनी नमूद केले.

महाराष्ट्रात आजच्या घडीला दररोज किमान १५ लाख लोक राष्ट्रगीत म्हणतात. मला वाटतं इतक्या मोठ्या संख्येने राष्ट्रगीताचा जागर करणारे देशातील महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य असेल असेही सामंत यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच उदय सामंत यांनी महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीताची सक्ती करण्याचे संकेत दिले होते. मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांची सुरूवात राष्ट्रगीताने व्हावी असा आमचा मानस असल्याचे ते यावेळी म्हणाले होते. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रवाद आणि देशभक्तीची भावना वाढीस लागावी म्हणून महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये कोणत्याही कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताच्या गायनाने व्हावी असा आमचा आग्रह असल्याचे सामंत म्हणाले होते. महाराष्ट्रात सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्याआधी राष्ट्रगीत लावण्यात येते. याचाच दाखला देत सामंत यांनी महाविद्यालयातील राष्ट्रगीताच्या आवश्यकतेवर जोर दिला होता. 

दरम्यान, शिवजयंतीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये राष्ट्रगीत गायन सक्तीचे झाल्याने सकाळी कामकाज सुरू होण्याआधी ते बंधनकारक असणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच देशभक्तीची भावना वाढण्यास मदत होईल. १९ फेब्रुवारीपासून सर्वच महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत सक्तीचे करण्यात आले आहे. अशाप्रकारे राष्ट्रगीताबाबत निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी