'दिल्ली भिजवणारी ही सभा महाराष्ट्र विसरणार नाही', राष्ट्रवादीने शेअर केला खास व्हिडिओ

पुणे
रोहित गोळे
Updated Oct 18, 2020 | 16:53 IST

Sharad Pawar: शरद पवार यांच्या साताऱ्यातील सभेला आज (१८ ऑक्टोबर) एक वर्ष पूर्ण झालं आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Sharad Pawar_Satara
शरद पवार यांच्या साताऱ्यातील सभेला एक वर्ष पूर्ण   |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हा एक अत्यंत महत्त्वाचा असा पक्ष आहे. याच पक्षाने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अतिशय आकस्मिकपणे भाजपसारख्या (BJP) बड्या पक्षाला कात्रजचा घाट दाखवत महाराष्ट्राची (Maharashtra) सत्ता पुन्हा काबिज केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या साताऱ्यातील (Satara) भर पावसातील एका सभेने राज्यातील विधानसभा निवडणुकीचं संपूर्ण चित्रच बदलून टाकलं. त्यांच्या याच सभेला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्याच निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने आज एक खास व्हिडिओ शेअर करुन त्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये शरद पवार यांच्या वर्षभरापूर्वीच्या सभेच्या आठवणी जागवल्या आहेत. यावेळी विरोधकांनी केलेल्या टीका आणि शरद पवार यांनी साताऱ्याच्या सभेत केलेलं भाषण हे या व्हिडिओमध्ये दाखविण्यात आलं आहे. मात्र, यावेळी या व्हिडिओत असंही म्हटलं आहे की, 'दिल्ली भिजवणारी ही सभा महाराष्ट्र विसरणार नाही!' 

दरम्यान, याच एका सभेमुळे राज्यातील विधानसभा निवडणुकीचं चित्र पालटलं होतं. इतकंच नव्हे तर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे भोसले यांना लोकसभा पोटनिवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. उदयनराजेंसाठी हा पराभव फारच मोठा होता. कारण तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर उदयनराजे हे सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून येत होते. पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे विधानसभेसोबतच येथे लोकसभेची देखील पोटनिवडणूक घेण्यात आली होती. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांचा अतिशय मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. 

दुसरीकडे काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या अनेक आमदारांना देखील पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. २०१९ निवडणुकीत भाजपच्या २०० हून अधिक जागा येणार असा दावा त्यांच्या नेत्यांकडून करण्यात येत होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने ग्रामीण भागात जोरदार मुसंडी मारत भाजपला १०५ जागांवरच रोखलं. 

दुसरीकडे मुख्यमंत्रीपदावरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्तेचं समीकरण काही जुळलं नाही. त्यामुळे शिवसेनेने थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार आणलं. त्यामुळे १०५ असे सर्वाधिक आमदार असणाऱ्या पक्षाला विरोधकाची भूमिका बजवावी लागत आहे. आता महाविकास आघाडी सरकारला देखील सत्तेत येऊन जवळजवळ वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे आता यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यामधील नेमकं राजकारण काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी