...अखेर राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलले, पाहा कुणावर बरसले! 

पुणे
रोहित गोळे
Updated Dec 21, 2019 | 11:45 IST

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषद घेऊन जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ता संघर्षावर टीकाही केली. 

mns chief raj thackeray attack on bjp shivsena congress and ncp in pune 
...अखेर राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलले, पाहा कुणावर बरसले!   |  फोटो सौजन्य: Facebook

पुणे: महाराष्ट्रात साधारण गेले दोन महिने जो काही राजकीय लपंडाव सुरु होता त्यामध्ये सर्वच पक्षातील नेते हे कायम मीडियासमोर दिसत होते किंबहुना आपआपल्या प्रतिक्रिया देत होते. पण या सगळ्या गदारोळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली काहीच भूमिका स्पष्ट केली नव्हती. मात्र, आज (शनिवार) राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली मतं व्यक्त केली. यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारसह भाजपवर देखील निशाण साधला. 'गेल्या महिन्या-दीड महिन्यात राज्यात जे काही घडलं ते पाहता हा महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान आहे. याला शिवसेना-भाजप जबाबदार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबाबत काही बोलायलाच नको.' असं म्हणत राज ठाकरे यांनी राज्यातील चारही प्रमुख पक्षांवर टीका केली आहे. 

'या निवडणुकीनंतर बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. पण यावेळी महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान झालाय ही गोष्ट निश्चित. मात्र, असं असलं तरी या निवडणुकीतील मला सगळ्यात चांगली वाटलेली गोष्ट म्हणजे ज्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केलं होतं त्यांना जनतेने जागा दाखवली आहे. पण असताना सत्तेसाठी राज्यात जे काही झालं ते अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यात सत्तेसाठी जे काही घडलं त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. याचा परिणाम पुढील निवडणुकीवर निश्चितच होईल.' असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील टीका केली. 

राज्यातील नव्या सत्ता समीकरणाबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 'यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात. त्यामुळे राज्यात जे काही झालं ते चुकीचं घडलं. फडणवीस आणि अजित पवार यांनी ज्या पद्धतीने सरकार स्थापन केलं. ते देखील खूपच चुकीचं होतं.' असं म्हणत राज ठाकरे यांनी आपली पत्रकार परिषद आटोपती घेतली. 

दरम्यान, महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाविषयी राज ठाकरे २३ जानेवारीला मुंबईत बोलणार आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी मुंबईत मनसेचं पहिलं अधिवेशन बोलावलं आहे. याचवेळी ते आपली संपूर्ण भूमिका स्पष्ट करणार आहेत. २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असते. तोच मुहूर्त साधून राज ठाकरे यांनी मनसेचं पहिलं अधिवेशन बोलावलं आहे. त्यामुळे आता या अधिवेशनात राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

पाहा महाराष्ट्रातील राजकारणाबाबत राज ठाकरे नेमकं काय म्हणाले: 

  1. हा महाराष्ट्रच्या मतदाराचा अपमान आहे
  2. शिवसेना आणि भाजप यांनी मतदारांचा अपमान केला.  
  3. या निवडणुकीतील चांगली गोष्ट म्हणजे ज्यांनी पक्षांतर केलं होतं त्यांना जनतेने जागा दाखवली 
  4. पण त्यानंतर सत्तेसाठी जे झालं ते दुर्दैवी 
  5. यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात 
  6. फडणवीस-अजित पवार सरकार ज्या पद्धतीने आलं ते देखील खूपच चुकीचं. 
  7. नव्या समीकरणांमुळे जनतेत प्रचंड नाराजी, याचा परिणाम पुढील निवडणुकीवर होईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी