Bhushi Dam Lonavala: लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये मुंबईकर तरुण बुडाला, पाच मित्रांच्या डोळ्यासमोर गेला वाहून

पुणे
सुनिल देसले
Updated Jul 12, 2022 | 21:12 IST

Lonavala Bhushi Dam: लोणावळ्यातील प्रसिद्ध असलेल्या भुशी डॅममध्ये तरुण-तरुणी पर्यटनासाठी मोठी गर्दी करत असतात. अशाच प्रकारे भुशी डॅमवर मुंबईतील तरुण गेले होते मात्र, त्यावेळी दुर्घटना घडली.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये मुंबईतील तरुण बुडाला
  • 25 फूट उंचावरुन कोसळला खाली आणि...
  • बुडालेल्या तरुणाचा शोध सुरू

लोणावळा : मुंबई-पुण्यासह संपूर्ण राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy rainfall in Maharashtra) पडत आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. तर धरणांतील पाणी साठ्यातही मोठी वाढ होताना दिसून येत आहे. मुसळधार पावसामुळे धबधबे, धरणांच्या ठिकाणी नागरिक पर्यटनासाठी गर्दी करु लागले आहेत. मात्र, विशेष काळजी न घेतल्याने अनेकदा दुर्घटना घडतात असाच प्रकार लोणावळ्यातील भुशी डॅम (Bhushi Dam Lonavala) येथे घडला आहे.

मुंबईतून लोणावळ्यात मित्रांसोबत पिकनिकला गेलेला एक तरुण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील साहिल सरोज नावाचा तरुण आपल्या मित्रांसोबत लोणावळा आणि खंडाळ्यात पिकनिकसाठी आला होता. मित्रांसोबत तो भुशी धरणाच्या जवळ असलेल्या धबधब्याजवळ गेला.

साहिल आणि त्याचे मित्र धबधब्यात भिजून मजामस्ती करत होते. मात्र, त्याच दरम्यान पाण्याचा मोठा प्रवाह आला आणि या पाण्याच्या प्रवाहात साहिलचे नियंत्रण सुटले. त्यानंतर साहिल वाहत पुढे गेला आणि त्यानंतर धबधब्यावरुन जवळपास 25 फूट उंचीवरुन तो खाली कोसळला. साहिल पाण्याच्या प्रवाहासोबत भुशी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये वाहून गेला. साहिल पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळताच घटनास्थळी लोणावळा पोलीस, स्थानिक नागरिक दाखल झाले.

पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने साहिलचा शोध सुरू केला. मात्र, अद्याप साहिलचा शोध लागलेला नाहीये. साहिल आपल्या मित्रांसोबत मजामस्ती करत होता आणि त्याच दरम्यान ही दुर्घटना घडली. आपल्या मित्रांसमोरच साहिल वाहून गेला मात्र, मित्र समोर असूनही काहीही करु शकले नाहीत.

नागपुरात नदीच्या प्रवाहात स्कॉर्पिओ गेली वाहून

तर तिकडे नागपुरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. नदीला आलेल्या पुरात एका स्कॉर्पिओ चालकाने गाडी चालवत नेण्याचा प्रयत्न केला मात्र, पाण्याच्या प्रवाहात ही स्कॉर्पिओ नदीत वाहून गेली. ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी गाडीत सहा ते आठ प्रवासी होती. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, स्थानिक नागरिकांच्या मदतीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी