निजामुद्दीनच्या मेळाव्यातील 182 जणांची यादी समोर, पुण्यात 106 जणांचा समावेश 

पुणे
पूजा विचारे
Updated Apr 01, 2020 | 22:26 IST

दिल्लीतील निजामुद्दीनच्या येथे झालेल्या तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात सहभागी झालेल्या व त्या परिसरात आढळून आलेल्या पुणे विभागातील 182 जणांची यादी समोर आली आहे. यातील 106 जण पुणे विभागात आढळले आहेत.

pune Nizamuddin
निजामुद्दीनच्या मेळाव्यातील 182 जणांची यादी समोर, पुण्यात 106 जणांचा समावेश   |  फोटो सौजन्य: ANI

पुणेः दिल्लीतील निजामुद्दीन भागात झालेल्या एका मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन परतलेल्या नागरिकांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसू लागली आहेत. याचा परिणाम आता महाराष्ट्र राज्यातही दिसू लागला. दिल्लीतील निजामुद्दीनच्या येथे झालेल्या तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात सहभागी झालेल्या व त्या परिसरात आढळून आलेल्या पुणे विभागातील 182 जणांची यादी समोर आली आहे. यातील 106 जण पुणे विभागात आढळले आहेत. तर उर्वरितांचा तपास सुरु असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

नवी दिल्लीतील तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जणांची यादी प्रशासनास प्राप्त झाली. यात पुण्यातील 136, साताऱ्यातील 5, सांगलीतील 3, सोलापुरातील 17 आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 21 जणांचा समावेश आहे. या माहितीची छानणी करताना त्यातील काही नावे दोनदा आढळून आली. तसेच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अतिरिक्त 7 व्यक्ती आहेत. 182 पैकी 106 जण आढळून आले आहेत. 

यामध्ये पुणे जिल्ह्यातील 70, सातारा जिल्ह्यातील 5, कोल्हापूर जिल्ह्यातील 10 आणि सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यातील 106 जणांना ट्रेसिंग करुन त्यातल्या 94 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्याचे स्त्रावनमुने घेतले जातील आणि त्या स्त्राव नमुना अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

या यादीतील 51 व्यक्तीच्या कॉल रेकार्डनुसार ते बाहेरच्या राज्यात असण्याची प्राथमिक शक्यता आहे. तर उर्वरित तपास गतीने सुरु आहे. काहींनी भ्रमणध्वनी सिमकार्ड बदलले असल्याची माहिती पोलीस तपासात आढळून आली आहे. ही माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

पुण्यातील 51 जण इतर राज्यातील असल्याची माहिती मिळाली असून या संदर्भात खात्री केली जात आहे. पुणे विभागातील 182 जणांचा  तपास सुरु असून ते विभागात असतील तर त्यांना क्वारंटाईन करण्यात येईल आणि त्यांचे स्त्राव नमुने घेतले जातील. स्त्राव नमुन्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याआधारे पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहितीही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी