एकतर्फी प्रेमाचा चाकू हल्ला; आठवीच्या वर्गातील मुलीची हत्या, हल्लेखोर प्रेमीला अटक

पुणे
भरत जाधव
Updated Oct 13, 2021 | 11:57 IST

पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनीची कबड्डी खेळत असताना चाकूने वार करुन हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे

Eighth grade girl murdered attacker boyfriend arrested
आठवीच्या वर्गातील मुलीची हत्या, हल्लेखोर प्रेमीला अटक   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • आरोपी तरुणाचे नाव शुभम भागवत आहे.
  • दीड वर्षांपूर्वीही मृत मुलीच्या कुटुंबीयांनी त्याला मुलीच्या मागे न येण्याचा इशारा दिला होता.
  • आरोपी तरुण मृत क्षितिजाचा नातेवाईक आहे.

पुणे: पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनीची कबड्डी खेळत असताना चाकूने वार करुन हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी डीसीपी नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाचे नाव शुभम भागवत आहे. तो मृत मुलीचा नातेवाईक आहे. दोन मोटारसायकलींवर आरोपी त्याच्या साथीदारांसह आला होता. ही एकतर्फी प्रेमाची बाब आहे. दीड वर्षांपूर्वीही मृत मुलीच्या कुटुंबीयांनी त्याला मुलीच्या मागे न येण्याचा इशारा दिला होता.

मृत मुलीचं नाव क्षितिजा अनंत व्यवहारे असून ती आठवीच्या वर्गात शिकत होती. मंगळवारी सांयकाळी यश लॉन्सच्या परिसरात कबड्डीचा सराव करत होती. तेव्हा तिचा नातेवाईक शुभम भागवत तेथे आला, त्याने क्षितिजाला आपल्या जवळ बोलवलं त्यानंतर दोघे बोलू लागले नंतर दोघांमध्ये वाद झाला. वाद झाल्यानंतर आरोपीने क्षितिजावर चाकुने अनेक वार केले. चाकू हल्ला केल्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला. पोलिसात तक्रार दाखल होताच आरोपी तरुणाला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहे. 

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या घटनेवरुन संताप व्यक्त केला असून ही घटना अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचे म्हटले होते.  “पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेने खाली गेली असून मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शासन करण्यात येईल,” असं आश्वासन अजित पवारांनी दिले होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी